महाराष्ट्रात बँक अधिकाऱ्यांचे आंदोलन तीव्र; ३० हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग
सोलापूर (कटूसत्य वृत्त) – महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्रात आजपासून मोठ्या प्रमाणावर आंदोलनाला सुरुवात झाली असून सुमारे ३० हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघटित शक्तीचे प्रदर्शन केले आहे. United Forum of Bank Unions यांच्या आवाहनानुसार हे आंदोलन सुरू असून राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व अधिकृत व्हॉट्सअँप गटांमधून बाहेर पडत निषेध नोंदवला. तसेच काळ्या फिती लावून कामकाज करत आहेत. सर्व व्यवहार केवळ नियम व प्रक्रियेनुसारच केले जात असून कोणतेही अतिरिक्त किंवा अनौपचारिक सहकार्य पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
सर्व शाखांमध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच कामकाज पूर्ण करून शाखा बंद करण्यात येत आहेत. त्यानंतर कोणतेही अधिकृत कॉल किंवा व्हर्च्युअल बैठक घेतल्या जात नाहीत. अधिकाऱ्यांनी आठ तासांच्या कामकाजाच्या नियमांचे काटेकोर पालन सुरू केले आहे. आंदोलनादरम्यान कोणत्याही अधिकृत कार्यक्रमांपासून दूर राहण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
हे आंदोलन पीएलआय (परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह) या नव्या धोरणाविरोधात असून, या धोरणामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कृत्रिम विभागणी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघटनांच्या मते, हा निर्णय विपाटाईट कराराचे उल्लंघन करणारा आहे.
All India Bank Officers' Confederation चे वरिष्ठ उपाध्यक्ष नीलेश पवार यांनी सांगितले की, “पीएलआयच्या नावाखाली बँकिंग क्षेत्रातील एकात्मतेला धक्का देण्याचा प्रयत्न होत आहे.” तर राज्य सचिव प्रमोद शिंदे यांनी, “हा लढा हक्कांसाठी असून गरज पडल्यास पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन व अचानक संपासाठीही आम्ही तयार आहोत,” असा इशारा दिला.
दरम्यान, संघटनांनी सरकार व बँक व्यवस्थापनाला इशारा दिला आहे की, निर्णय मागे घेतला नाही तर पुढील टप्प्यात अचानक संप पुकारला जाऊ शकतो. त्यामुळे राज्यातील बँकिंग क्षेत्रात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment