माढा पंचायत समितीच्या सभापतीपदी पंडित देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 13, 2026

माढा पंचायत समितीच्या सभापतीपदी पंडित देशमुख

 माढा पंचायत समितीच्या सभापतीपदी पंडित देशमुख




उपसभापतीपदी स्वाती गिड्डे यांची बिनविरोध निवड

माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या मानेगाव पंचायत समिती गणातील पंडित देशमुख तर उपसभापतीपदी स्वाती गिड्डे यांची निवड बिनविरोध झाली आहे. 

माढा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा सभापती व उपसभापती झाला आहे.

पंचायत समितीत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आली आहे.

माढा तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीत करमाळा मतदारसंघात असलेल्या भोसरे, रोपळे (क), कुर्डू, अकोले खुर्द या चार गणातून माजी आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवलेले चार उमेदवार विजयी झाले होते.

तर दुसरीकडे माढा विधानसभा मतदारसंघातील १० गणामध्ये रणजीतसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघातील मानेगाव, उपळाई बुद्रुक, लऊळ, टेंभूर्णी, रांझणी, पिंपळनेर या गणातून कमळ चिन्हावर सहा पंचायत समिती विजयी झाले.

भुताष्टे गणातून भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत स्वाती गिड्डे विजयी झाल्या. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला माढा तालुका पंचायत समितीमध्ये अकरा जागांसह स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांचा पाठिंबा असलेला सभापती होणार हे निश्चित होते.

अपेक्षेप्रमाणे सभापतीपदासाठी मानेगाव गणातील पंडित देशमुख यांनी तर उपसभापतीसाठी भुताष्टे गणातील भाजप पुरस्कृत स्वाती गिड्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. श्नी. देशमुख यांना पिंपळनेर गणातील बिभीषण डांगे हे सूचक असून सौ. गिड्डे यांना अकोले खुर्द गणातील संभाजी पाटील सुचक आहेत. निवडीनंतर (कै.) विठ्ठलराव शिंदे यांच्या पुतळ्यास सभापती देशमुख यांनी पुष्पहार घातला.

पंचायत समितीत आमदार अभिजीत पाटील यांचे समर्थकांना दोन तर अपक्ष एकजण विजयी झाला आहे. सभापतीपदासाठी बेंबळे गणातील आमदार अभिजीत पाटील समर्थक पोपट अनपट यांनी तर माजीमंत्री तानाजीराव सावंत समर्थक सोनाली साठे उपसभापतीसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र ते अर्ज मागे घेण्यात आल्याने निवडी बिनविरोध झाल्या.

निवडीवेळी‌ पंचायत समिती कार्यालयात माजी आमदार संजय शिंदे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पीठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी जयश्नी आव्हाड यांनी काम पाहिले. यावेळी तहसीलदार संजय भोसले, गटविकास अधिकारी महेश सुळे उपस्थित होते.

सभापती पंडित देशमुख हे माढा विधानसभा मतदारसंघातील पूर्व भागातील धानोरे येथील‌ असून या भागात त्यांचे मोठे राजकीय वजन असल्याने भाजप नेते रणजितसिंह शिंदे यांनी या भागातील आमदार अभिजीत पाटील यांच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न या निवडीतून केला असून, उपसभापती स्वाती गिड्डे या सापटणे गावच्या असून त्या करमाळा विधानसभा मतदारसंघात येतात. माजी आमदार संजय शिंदे यांना याचा फायदा होणार आहे. सभापती व उपसभापती निवडीत माढा व करमाळा मतदारसंघाचा समतोल राखण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages