राज्यात गॅसचा मर्यादित साठा, हॉटेल व्यावसायिकांसोबत घरगुती गॅसधारक संकटात? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 12, 2026

राज्यात गॅसचा मर्यादित साठा, हॉटेल व्यावसायिकांसोबत घरगुती गॅसधारक संकटात?

 राज्यात गॅसचा मर्यादित साठा, हॉटेल व्यावसायिकांसोबत घरगुती गॅसधारक संकटात?




मुंबई (कटूसत्य वृत्त):- अमेरिका इस्रायल- इराण युद्धाचे परिणाम आता महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. ऊर्जेचा मोठा स्रोत असलेल्या मध्य पूर्वेतून होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महाराष्ट्रात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

परिस्थिती इतकी गंभीर आहे की, राज्यातील हॉटेल व्यावसायिकांकडे अवघा एक दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असून, अनेक शहरांत हॉटेल चालकांवर चक्क चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये गॅस पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा संपत आल्याने हॉटेल चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक हॉटेल चालकांवर चक्क चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल चालकांनी हॉटेलच्या बाहेरच चुलभट्ट्या पेटवल्या आहेत. शहरातील खानावळी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी गॅसची वाट पाहण्याऐवजी लाकूड आणि कोळशावर आधारित चुलींचा वापर सुरू केला आहे. "हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात जेवण शिजवावे लागते, इतक्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करणे परवडणारे नाही," अशी व्यथा हॉटेल व्यावसायिकांनी मांडली आहे. उपराजधानी नागपुरातही व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याचे चित्र आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अनेक नामांकित हॉटेलच्या मालकांनी आता चुलींचा आधार घेतला आहे. मात्र, यामुळे जेवण मिळण्यास उशीर होत असून ग्राहकांचीही गैरसोय होत आहे.

सोलापूरात पहाटेपासूनच गॅस वितरण केंद्राबाहेर रांगा

सोलापूरच्या रामवाडी परिसरातील गॅस गोडाऊनवर आज अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. "चार दिवसांपूर्वी बुकिंग करूनही आज नंबर लागला," अशी हतबलता ग्राहकांनी व्यक्त केली. ऑनलाइन बुकिंग होत नसल्याने अनेक नागरिक थेट रिकाम्या टाक्या घेऊन ऑफिसवर धडकले. "टाक्या उपलब्ध आहेत, गर्दी करू नका," असे आवाहन एजन्सीकडून केले जात असले, तरी 'पुढच्या काळात गॅस मिळेल की नाही' या भीतीने ग्राहक हटायला तयार नाहीत.

जळगावात महिनाभरापासून बुकिंग पेंडिंग

जळगावच्या बी.जे. मार्केटमधील भारत गॅस एजन्सीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. "महिनाभरापूर्वी बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही, मग घरात स्वयंपाक कसा करायचा?" असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. एजन्सीचे कर्मचारी दाद देत नसल्याचा गंभीर आरोपही ग्राहकांनी केला आहे. युद्धाच्या नावाखाली साठेबाजी तर होत नाही ना? असा संशय आता जळगावकर व्यक्त करत आहेत.

अमरावतीत सामान्य ग्राहकांचे हाल

अमरावतीच्या रुक्मिणी नगरमध्ये गॅस एजन्सीने केवळ व्हॉट्सॲपवर बुकिंग अनिवार्य केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. अनेकांकडे कंपनीचे अधिकृत व्हॉट्सॲप नंबर नाहीत, तर काहींना तंत्रज्ञानाची माहिती नाही. अशा परिस्थितीत ज्यांचे व्हॉट्सॲप बुकिंग आहे, त्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याने सामान्य ग्राहक तासनतास रांगेत उभे आहेत.

जालन्यातील हॉटेल व्यावसायिक संकटात

जालन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. हॉटेल चालक आणि छोट्या खानावळींकडे केवळ १ ते २ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. "गॅस संपला तर चूल पेटवण्याशिवाय पर्याय नाही, पण रोजच्या धंद्याचं काय?" असा प्रश्न जालन्यातील व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages