पंढरपूरात होणार नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय कारभाराचा वाढता ताण व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेत सोलापूर जिल्ह्यासाठी आणखीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे.
पंढरपुरात हे कार्यालय होण्याची शक्यता असून यामुळे पंढरपूर, माळशिरस, माढा, सांगोला या तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा आला आहे
प्रशासकीय कामकाजात वाढलेला ताण लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात ११ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरी दिली आहे. त्यामध्ये सोलापूरचा समावेश आहे. राज्यातील काही जिल्ह्यात प्रशासकीय कामकाजाचा ताण वाढ असल्याने मंगळवारी महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसमेत राज्यात अकरा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरी दिल्याची घोषणा केली आहे. सोलापूर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तारमोठा आहे.
महसूल विभागाशी संबंधित कामांचा ताणही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे नागरिकांची कामे जलदगतीने मार्गी लागावीत, प्रशासन अधिक कार्यक्षम व्हावे, या उद्देशाने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय महसूलमंत्र्यांनी घेतला आहे.अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय झाल्यानंतर महसूल विभागातील विविध प्रकरणांची सुनावणी, जमीन विषयक कामे, तसेच प्रशासकीय निर्णयांची प्रक्रिया अधिक गतीने होणार आहे. नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कामासाठी होणारी प्रतीक्षा आणि गर्दीही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आल्यावर कमी होण्यास मदत होणार आहे.

No comments:
Post a Comment