गुन्हेगारांवर पोलिसांचा शिकंजा; विशेष पथकाची थेट छापेमारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2026

गुन्हेगारांवर पोलिसांचा शिकंजा; विशेष पथकाची थेट छापेमारी

 गुन्हेगारांवर पोलिसांचा शिकंजा; विशेष पथकाची थेट छापेमारी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक सक्रिय झाले असून, जुगार अड्डे, अवैध वाळू वाहतूक, ऑर्केस्ट्रा बारमधील गैरप्रकार, अवैध दारुनिर्मिती व विक्री, तसेच लॉजमधील अनैतिक प्रकारांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.

अलीकडेच ऑर्केस्ट्रा बारमधील अवैध प्रकारांबाबत राज्याच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही संशय व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

या पथकाला पोलिस अधीक्षक किंवा अपर पोलिस अधीक्षकांकडे येणाऱ्या गोपनीय माहितीच्या आधारे थेट कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. माहितीची शहानिशा करून पथक संबंधित ठिकाणी अचानक छापे टाकते. अनेकदा स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना न देता कारवाई करण्यात येते, हे या पथकाचे वैशिष्ट्य आहे.

सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक, जुगार अड्डे, ऑर्केस्ट्रा बारमधील अश्लील नृत्य व पैशांची उधळण, लॉजमध्ये चालणारे वेश्या व्यवसाय, तसेच अवैध मद्यनिर्मिती व विक्री यांसारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. स्थानिक पोलिसांकडून कारवाई होत असली तरी हे प्रकार पूर्णपणे थांबलेले नसल्याचे दिसून येते.

विशेष पथकात स्थानिक गुन्हे शाखा, कंट्रोल रूम आणि मुख्यालयातील अधिकारी व अंमलदारांचा समावेश असून, प्रत्येक कारवाईसाठी वेगवेगळे पथक तयार केले जाते. अधिकारी व कर्मचाऱ्यांची सतत अदलाबदल केली जात असल्याने कारवाई अधिक गोपनीय आणि प्रभावी ठरत आहे.

“गोपनीय माहितीच्या आधारे तातडीने कारवाई”
पोलिस अधीक्षक किंवा अपर अधीक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार त्वरित पडताळणी करून विशेष पथकाद्वारे कारवाई केली जाते. पथकातील अधिकारी व अंमलदारांची नियमित अदलाबदल केली जाते, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली.

दरम्यान, सोलापूर ग्रामीणमध्ये २५ पोलिस ठाण्यांमार्फत सुमारे साडेचार हजारांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे. तरीही, थेट वरिष्ठांकडे येणाऱ्या तक्रारींवर विशेष पथकाकडून स्वतंत्रपणे कारवाई केली जाणार असून, नागरिकांनी अवैध धंद्यांची माहिती थेट पोलिस प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages