सार्वजनिक शौचालय प्रकल्पावरून सभागृहात गदारोळ
प्रस्ताव फेरविचारासाठी परत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वच्छ भारत अभियान शहरी 2.0 अंतर्गत सार्वजनिक शौचालय प्रकल्पावरून सोलापूर महानगरपालिकेच्या तिसऱ्या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला. प्रकल्पाच्या खर्चात झालेल्या मोठ्या वाढीवर नगरसेवक प्रविण दर्गोपाटील यांनी तीव्र आक्षेप घेत प्रशासनाला थेट सवाल केला.
शासनाच्या निकषानुसार प्रति सीट ₹1.50 लाख खर्च अपेक्षित असताना ३२६ सीटसाठी सुमारे ₹4.89 कोटी खर्च अपेक्षित होता. मात्र सादर प्रस्तावात तब्बल ₹ 5.55 कोटी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आल्याने सभागृहात प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ₹ 4.89 कोटींच्या प्रकल्पासाठी खर्च दुप्पट कसा वाढला? असा थेट सवाल दर्गोपाटील यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी प्रशासनाच्या आर्थिक नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हा केवळ अंदाजपत्रकाचा मुद्दा नसून जनतेच्या पैशाच्या हिशोबाचा प्रश्न आहे, असे ठामपणे सांगितले.
तसेच २७ ठिकाणी शौचालय उभारणीसाठी कोणता सर्वेक्षण अहवाल, तांत्रिक मोजमाप किंवा गरजांचा अभ्यास करण्यात आला आहे का, याचीही विचारणा केली.
याशिवाय, जुन्या ६१४ सीट शौचालये निष्कासित करून फक्त ३२६ नवीन सीट उभारण्याच्या निर्णयावरही त्यांनी आक्षेप घेतला. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय काळात घाईघाईत प्रस्ताव सादर करून प्रशासकीय ठराव करण्यात आला होता.
सभागृहात गोंधळ सुरू असताना दर्गोपाटील यांनी थेट आयुक्तांच्या डायसकडे जाऊन विषय मांडला. अखेर आयुक्तांनी हा प्रस्ताव सध्याच्या स्वरूपात मंजूर न करता फेरप्रस्ताव सादर करून नव्याने सविस्तर पूर्वगणक करण्यास मान्यता दिली.
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या जनसेवेच्या सूचनेनुसार प्रभागात दैनंदिन कामकाज करत असतानाच शहराच्या हितावर परिणाम करणाऱ्या चुकीच्या निर्णयांविरोधात सभागृहात ठामपणे आवाज उठवला पाहिजे, या भूमिकेतूनच आज नगरसेवक प्रविण दर्गोपाटील यांनी प्रथमच सभागृहात सार्वजनिक स्वच्छालयाच्या संशयास्पद अतिरिक्त निधीवर संबंधी आक्रमक भूमिका घेत, शहरहिताच्या प्रश्नांवर निर्भीडपणे मनपा सभागृहात बोलले.
.png)
No comments:
Post a Comment