निसर्गाच्या लहरीपणाचा आंब्याला फटका
नुकसान भरपाईसाठी कृषिमंत्री भरणे यांना निवेदन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्यात काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या अवकाळी पाऊस, भीषण गारपीट आणि सतत बदलत्या हवामानाचा मोठा तडाखा आंबा उत्पादक पट्ट्यांना बसला असून, या नैसर्गिक आपत्तीमुळे बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत शुक्रवार दि 20 रोजी 'महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनी'च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना सचिन नलावडे आणि शेतकऱ्यांनी नुकसानीचे सविस्तर निवेदन देऊन तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे.
यावर्षी वातावरणातील तीव्र बदलांमुळे राज्यातील अनेक आंबा उत्पादक पट्ट्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागात मोहोर उशिरा आला आणि त्यानंतर अचानक वाढलेल्या अति थंडीमुळे तो मोठ्या प्रमाणावर करपून गेला. त्यातच अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे फळधारणा अत्यंत कमी झाली असून हजारो शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. आंबा हे राज्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून हजारो कुटुंबांचे अर्थकारण यावर अवलंबून असताना हवामानातील अनिश्चिततेमुळे उत्पादक सध्या पूर्णपणे हतबल झाला आहे.
या पार्श्वभूमीवर,शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे की, कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि आंबा बागेचे आर्थिक मूल्य लक्षात घेऊन प्रति हेक्टर किमान १० लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर करावी. तसेच आंबा पिकासाठी स्वतंत्र आणि प्रभावी 'पीक विमा' योजना लागू करून त्यात मोहोर करपणे, अवेळी पाऊस, अति थंडी आणि गारपिटीसारख्या सर्व नैसर्गिक जोखमींचा समावेश करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून तातडीने परतावा मिळणे सुलभ होईल. यासोबतच आंबा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी आंबा पिकाला योग्य 'हमीभाव' देण्याबाबत शासनाने ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा,अशी आग्रही मागणी 'महादेश'तर्फे करण्यात आली आहे.
चौकट
"यंदा मोहोराची स्थिती चांगली असताना अचानक आलेल्या गारपीट आणि अति थंडीमुळे झाडांवरचा मोहोर पूर्णपणे करपून गेला आहे.वर्षभर औषध फवारणी, खते आणि मजुरीवर केलेला मोठा खर्चही आता निघणे कठीण झाले असून निसर्गाने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे अशा वेळी केवळ आश्वासन नको तर प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात येऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत.आंबा उत्पादकांना प्रति हेक्टर किमान १० लाख रुपयांचे विशेष पॅकेज देऊन लवकरात लवकर दिलासा द्यावा तरच शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल."
सुवर्णा पाटील,आंबा उत्पादक शेतकरी,निमगाव म.
चौकट
"नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश"
"महादेश फार्मर प्रोड्युसर कंपनीने आंबा उत्पादकांच्या समस्यांबाबत जे निवेदन दिले आहे, त्यातील मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने देण्यात आले आहेत. आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल, यासाठी शासन स्तरावर आमचे प्रयत्न सुरू आहेत."
— ना दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य
.png)
No comments:
Post a Comment