इराणवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ 4 मार्च रोजी माकप कडून आक्रमक जनआंदोलन- कॉ. आडम मास्तर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

इराणवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ 4 मार्च रोजी माकप कडून आक्रमक जनआंदोलन- कॉ. आडम मास्तर

 इराणवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ 4 मार्च रोजी माकप कडून आक्रमक जनआंदोलन- कॉ. आडम मास्तर




सोलापूर(कटूसत्य वृत्त):- इराणवर सुरू असलेल्या आक्रमक लष्करी कारवायांच्या निषेधार्थ भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (माकप) तर्फे दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे तीव्र व आक्रमक जनआंदोलन व निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत.

पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इराणवर अमेरिका व इस्रायलने केलेले हल्ले हे त्या देशाच्या सार्वभौमत्वावर उघड आक्रमण असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे घोर उल्लंघन आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे मध्यपूर्वेत तणाव प्रचंड वाढला असून जागतिक शांततेसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे.

माकपचा ठाम विश्वास आहे की युद्ध हा कोणत्याही प्रश्नाचा उपाय नाही. संवाद, कूटनीती आणि शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच मतभेद सोडविले जावेत. लष्करी हस्तक्षेपामुळे निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत, तेलाच्या किमती वाढून सर्वसामान्य जनतेवर महागाईचा अतिरिक्त भार पडत आहे आणि जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कॉ. आडम मास्तर यांनी केंद्र सरकारला आवाहन केले की भारताने आपल्या स्वतंत्र व निर्भीड परराष्ट्र धोरणाची परंपरा जपत या हल्ल्यांचा स्पष्ट शब्दांत निषेध करावा व तात्काळ युद्धविरामासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढाकार घ्यावा. भारत हा शांतता, सहअस्तित्व आणि निर्गुट परंपरेचा पुरस्कर्ता देश असून त्याने ठाम युद्धविरोधी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शेवटी माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शांतताप्रेमी नागरिक, कामगार, शेतकरी, युवक, महिला व लोकशाहीवादी संघटनांना 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आक्रमक जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

माकप हा शांतता, लोकशाही आणि जनतेच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असून आंतरराष्ट्रीय पातळीवर साम्राज्यवाद व आक्रमणवादाच्या विरोधात आपला संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages