लावणी नृत्य स्पर्धेत नटरंग सांस्कृतिक कला केंद्र प्रथम
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती शंकरनगर - अकलूज यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी मोडनिंब जि. सोलापूर या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रोख रुपये तीन लाख व सन्मानचिनह देऊन गौरविण्यात आले.
स्मृती भवन शंकरनगर येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०८ व्या जयंती निमित्त दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च या कालावधीत राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आमदार दिलीप सोपल, जयंती समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील, स्पर्धा समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील, परीक्षक डॉ. शशिकांत चौधरी, प्रा.चं.वी. जोशी, प्रा. मधुकर गायकवाड, सहकार महर्षी कलावंत पुरस्कर्ते पांडुरंग घोटकर, रेश्मा परितेकर, प्रमिला लोदगेकर यांचे सह थिएटर मालक, कलाकार व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील रुक्मिणी अर्चना जोत्स्ना वाईकर पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे (ता. वाई जि. सातारा) आणि प्रिया नगरकर न्यु अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी यवत-चौफुला (जि पुणे) या संघांनी विभागून द्वितीय क्रमांक पटकावला.त्यांना प्रत्येकी रोख रुपये दोन लाख व सन्मानचिन्ह देण्यात आले. तर वैशाली समसापूरकर जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी (जि पुणे) या संघाने तृतीय क्रमांकासह रोख रुपये एक लाख व सन्मानचिन्ह पटकावले.
अलंकार सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी सुपा (जि. अहिल्यानगर) यांनी चतुर्थ क्रमांक, आणि वैष्णवी कोल्हापूरकर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप-वाठार (जि. कोल्हापूर) व अपर्णा किर्ती नगरकर लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी (जि पुणे) यांनी विभागून पाचवा क्रमांक पटकावला.
तर वैयक्तिक बक्षिसा मध्ये उत्कृष्ट मुजरा रु.३ हजार नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी मोडनिंब (जि सोलापूर), उत्कृष्ट गायिका राखी चौरे, उत्कृष्ट ढोलकी वादक राहुल जावळेकर, उत्कृष्ट हार्मोनियम वादक-अनिकेत साळुंखे अंबप-वाठार यांना प्रत्येकी रु. एक हजार व सन्मान चिन्ह देऊन उपस्थितांच्या हस्ते गौरविण्यात आले.
परीक्षक डॉ.चं.वी. जोशी म्हणाले, मागील अनेक वर्षापासून जयसिंह मोहिते पाटील यांनी ही लोककला जपली आहे. डॉ. शशिकांत चौधरी म्हणाले, कलाकारांचे राबणं, नर्तन, व्यथा वेदना व श्रमाचे चीज व्हावे यासाठी मागील ३० वर्षापासून लावणी स्पर्धेचे हे शिवधनुष्य जयसिंह मोहिते पाटील यांनी पेलेलं आहे. टाळ आणि चाळ, भक्ती आणि शृंगार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून यातून महाराष्ट्र उजळला आहे.
दोन दिवसाच्या स्पर्धा कालावधीत अनेक ज्येष्ठ व नवकलाकारांनी जयसिंह मोहिते पाटील यांना लावणी क्षेत्रातील योगदानाबद्दल शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा अशी इच्छा व्यक्त केली.सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी राजकुमार पाटील यांनी केले.
चौकट...
कलावंत हा टाळ्यांचा भुकेला असतो तो आत्मविश्वासाने व ताकतीने आपली कला रंगमंचावर सादर करत असतो. रसिकांनीही त्यांना भरभरून दाद दिली पाहिजे.
-जयसिंह मोहिते पाटील, संस्थापक अध्यक्ष

No comments:
Post a Comment