मिल्क अँड मिलेट व्हिलेज” भालेवाडी येथे हुरडा पार्टी व शिवार भोजन उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 28, 2026

मिल्क अँड मिलेट व्हिलेज” भालेवाडी येथे हुरडा पार्टी व शिवार भोजन उत्साहात

   मिल्क अँड मिलेट व्हिलेज भालेवाडी येथे हुरडा पार्टी व शिवार भोजन                                                         उत्साहात




सोलापूर(कटूसत्य वृत्त):- (जिमाका):- एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पांतर्गत विशेष घटक आधारित पर्यटनाच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या भालेवाडी (ता. मंगळवेढा) येथील मिल्क अँड मिलेट व्हिलेज या संकल्पने अंतर्गत हुरडा पार्टी व पारंपरिक शिवार भोजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सदर उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून प्रकल्पास तांत्रिक सहाय्य प्रायमूव्ह, पुणे यांचे लाभत आहे.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकारी व ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने ज्वारीच्या कणसांचा हुरडा भाजून कणीस मळण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिवारफेरीत विविध पिकांची पाहणी केली व  स्थानिक शेती पद्धतींची माहिती घेतली. तसेच झाडांवरील ताज्या फळांचा आस्वाद घेत ग्रामीण जीवनशैलीचा जवळून परिचय करून देण्यात आला. ग्रामीण वातावरणात आयोजित शिवार भोजनामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचे सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली.

मिल्क अँड मिलेट व्हिलेज या संकल्पनेद्वारे दुग्धव्यवसाय व भरड धान्य (मिलेट्स) आधारित शेतीला प्रोत्साहन देत पर्यटनाशी संलग्न पूरक व्यवसायांची संधी निर्माण होत आहे. या माध्यमातून स्थानिक महिला बचत गट, शेतकरी व युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे.

या कार्यक्रमास उप कार्यकारी अधिकारी (जि.प.) सूर्यकांत भुजबळ, जिल्हा परिषद अधिकारी (वी.पी.) वैभव अहाळे, तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, तालुका उपकृषी अधिकारी प्रशांत काटे उपस्थित होते. तसेच भालेवाडीचे सरपंच श्रीकांत दवले, गाईड वनमित्र नानासाहेब रोंगे, ग्राम महसूल अधिकारी दत्तात्रय गायकवाड, एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाचे कृषी पर्यटन तज्ञ रमेश खळदकर, स्थापत्य अभियंता विनायक जवळकोटे, संवाद तज्ञ नितीन सुकळीकर, क्षेत्र समन्वयक भूषण महाजन, पर्यटन समिती सदस्य व इतर ग्रामस्थ मिळून एकूण 62 जणांची उपस्थिती होती.

अधिकृत प्रतिक्रिया :

भालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेला ‘मिल्क अँड मिलेट व्हिलेज’ अंतर्गत हुरडा पार्टी व शिवार भोजन हा उपक्रम ग्रामीण पर्यटन विकासाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आणि दिशादर्शक ठरत आहे. स्थानिक शेती, दुग्धव्यवसाय आणि भरड धान्य आधारित उत्पादनांना पर्यटनाशी जोडून गावाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा प्रभावी उपक्रम आहे. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रशासनाच्या समन्वयातून ही संकल्पना आगामी काळात जिल्ह्यात आदर्श मॉडेल म्हणून विकसित होईल, असा विश्वास आहे.” असे उप कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सूर्यकांत भुजबळ यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages