EVM विरोधात बाळराजे पाटील यांचे आंदोलन तीव्र धुळे–सोलापूर महामार्गावर टायर जाळून संतप्त निषेध
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा (EVM) विरोधात सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र होत असून, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठा, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळराजे आवारे पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यात दिनांक १६ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. “EVM हटवा, लोकशाही वाचवा” या ठाम भूमिकेसह त्यांनी शासन आणि निवडणूक आयोगासमोर ठोस मागण्या मांडल्या आहेत.
बाळराजे पाटील यांनी आपल्या उपोषणाद्वारे EVM प्रणाली पूर्णपणे बंद करून पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. EVM मशीनमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, यामुळे देशाच्या लोकशाही मूल्यांना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेला धक्का बसत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आमरण उपोषणाला पाच दिवस पूर्ण होऊनही शासन अथवा निवडणूक आयोगाकडून कोणतीही अधिकृत दखल न घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज संतप्त कार्यकर्त्यांनी धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून तीव्र निषेध आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
निषेध आंदोलनादरम्यान “Ban EVM – Save Democracy”, “Ban EVM – Save India” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. निवडणूक आयोगावर लोकशाहीची गळचेपी केल्याचा आरोप करत, शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून बाळराजे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, आंदोलन उग्र रूप धारण करू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शासनाने लवकरात लवकर दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
EVM विरोधातील हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून, लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असे मत आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments