रस्ते अपघात रोखण्यासाठी नियमांचे पालन गरजेचे : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशभरात, विशेषतः तामिळनाडू आणि महाराष्ट्र राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, यामध्ये मानवी तसेच तांत्रिक चुका कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी परिवहन विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
नियोजन भवन येथे आयोजित *३७ व्या जिल्हा रस्ता सुरक्षा अभियान २०२६* च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त सचिन ओंम्बसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा चालक-मालक संघटनांचे प्रतिनिधी तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की, रस्ते अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. वाहन चालविताना वेगमर्यादा पाळणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे, वाहतुकीच्या सूचना व सिग्नलचे पालन करणे यामुळे अनेक अपघात टाळता येऊ शकतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी रस्ते अपघातांची प्रमुख कारणे, अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यावरील उपाययोजना यांची माहिती दिली. १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचा अपघातातील मृत्यूदर अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. सोलापूर जिल्ह्यातही अपघातांचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. १३ जानेवारी हा दिवस देशभरात रस्ता सुरक्षा अभियान म्हणून साजरा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, वेगमर्यादा पाळावी आणि वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन त्यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार यांनीही सुरक्षित रस्ते, योग्य देखभाल आणि अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी रस्ते अपघातात जखमींना मदत करून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या ‘जीवनदूत’ व्यक्तींना जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते जीवनदीप पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी, प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी तसेच समाजातील विविध घटकांतील व्यक्तींचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments