Hot Posts

6/recent/ticker-posts

मत विकू नका!

 मत विकू नका!



महाराष्ट्रातील महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या जे वातावरण तयार झाला आहे, ते लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असायला हवा; पण आज तो पैसे, दारू, जेवणावळी, सहली, धमक्या आणि गुंडगिरीचा बाजार बनत चालला आहे. “लक्ष्मी दर्शन”, रोख रक्कम, दारूच्या बाटल्या, ढाबा पार्टी, हॉटेल बुकिंग आणि नेत्यांच्या उघड धमक्या यामुळे निवडणुकीची हवा अक्षरशः दूषित झाली आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे काही तथाकथित मोठे नेते जाहीर सभांमध्ये निर्लज्जपणे सांगतात, “त्यांचे पैसे घ्या आणि आम्हालाच मत द्या.” ही केवळ बेशरम विधाने नाहीत, तर लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारी मानसिकता आहे. अशा वेळी लोकशाही वाचवण्याची संपूर्ण जबाबदारी थेट मतदारांवरच येऊन पडते.
पैसा घेऊन दिलेले मत म्हणजे व्यवहार असतो; तर निःस्वार्थपणे दिलेले मत म्हणजे लोकशाहीची सेवा. पाच-दहा हजार रुपये घेऊन मत विकणे हा क्षणिक फायदा वाटतो; पण प्रत्यक्षात तो पाच वर्षांच्या यातनांचा करार असतो. फुटलेली गटारे, अनियमित पाणीपुरवठा, कचऱ्याचे ढीग, बंद पडलेले दवाखाने, औषधांचा अभाव, गल्लीबोळातील अराजक — हे सगळे त्या ‘विकलेल्या मता’चे परिणाम असतात.
मत विकून निवडून आलेला नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी नंतर मतदाराच्या दारात उभासुद्धा राहत नाही. उलट तो निर्ढावलेपणाने विचारतो, “मी तुम्हाला फुकट दिलं होतं का?” तेव्हा मतदाराच्या लक्षात येते की पाच हजार रुपयांत विकलेले मत म्हणजे पाच वर्षांच्या अपमानाचे, त्रासाचे आणि उपेक्षेचे तिकीट होते.
या पैशांच्या राजकारणाचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे खऱ्या सेवाभावी, प्रामाणिक आणि समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे राजकारणातून हद्दपार होणे. आज निवडणूक म्हणजे ‘ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे सत्ता’ हे विकृत समीकरण बनले आहे. जेवणावळी, सहली, देवदर्शन, भेटवस्तू याच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जात आहेत; आणि लोकांसाठी रात्रंदिवस काम करणारे कार्यकर्ते हरत आहेत. कारण आज मेहनत नाही, तर पैसा जिंकतो.
दरवेळी असेच होत राहिले तर नगरसेवक, आमदार, खासदार सगळेच पैशाच्या पुरात वाहून जातील. लोकशाही कायदे बनवणाऱ्यांच्या हातात न राहता माफिया, दलाल, गुंड, दारूवाले, वाळू माफिया, बिल्डर आणि काळाबाजार करणाऱ्यांच्या ताब्यात जाईल. निवडणुकीत दिले जाणारे पाच-दहा हजार रुपये ही मदत नसते; ती एक साखळी असते. त्या साखळीच्या दुसऱ्या टोकाला गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि समाजाचा ऱ्हास उभा असतो.
मतदारराजा जागा झाला तरच ही साखळी तुटू शकते. एक मत एका गल्लीचे भविष्य बदलू शकते, एक शहर वाचवू शकते, एक पिढी घडवू शकते. आणि तेच मत पैशात विकले गेले तर एक पिढी रसातळाला नेण्याची ताकदही त्यात असते.
लोकशाही वाचवायची असेल, तर मतदारांनी ठाम भूमिका घ्यावी लागेल. पैशाचे आमिष नाकारले पाहिजे. दारू, भेटवस्तू, ढाबा पार्टी, सहली यांना स्पष्ट नकार दिला पाहिजे. जो उमेदवार पैसे देतो, तोच सर्वात अयोग्य आहे, ही जाणीव मनात पक्की झाली पाहिजे. परिश्रमी, उपलब्ध, सेवाभावी आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारालाच मत दिले पाहिजे. भीती, दहशत, दबाव यांना थारा दिला तर लोकशाहीच संपेल.
लोकशाहीचे खरे रक्षण मतदान केंद्रावर होते. “तुमची निवड विकत घेता येत नाही” हे उमेदवारांना दाखवून देणे हाच निवडणुकीतला खरा विजय आहे. गुंड, माफिया, दलाल आणि काळ्या पैशांचे वर्चस्व मोडायचे असेल, तर त्यांना मतदानातून वठणीवर आणण्याची ताकद केवळ मतदारांकडेच आहे.
मतदारराजा, पाच हजारांच्या आमिषात पाच वर्षांचे भविष्य विकू नका. तुमचे मत अमूल्य आहे. त्याला किंमत लावू नका.
मतदारराजा जागा हो!
Reactions

Post a Comment

0 Comments