मंगळवेढा पालिकेत महायुतीचा डाव सफल; उपनगराध्यक्षपदी प्रा. येताळा भगत
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक प्रा. येताळा भगत यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अजित जगताप व अरुण किल्लेदार यांची निवड जाहीर करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नऊ, भाजपचे नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक विजयी झाले होते. त्यामुळे नगरपालिकेवर महायुतीचे स्पष्ट वर्चस्व निर्माण झाले असून उपनगराध्यक्षपद महायुतीकडे जाणे जवळपास निश्चित झाले होते.
उपनगराध्यक्ष निवडीसाठी पीठासीन अधिकारी सुनंदा आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपनगराध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रा. येताळा भगत तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सीमा बुरजे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, सीमा बुरजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रा. येताळा भगत यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडीची घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. निवडीच्या वेळी प्रतीक्षा मेटकरी, नागर गोवे, प्रमोद सावजी, विद्यागौरी अवघडे, सोमनाथ आवताडे, चंद्रकांत घुले, विजया गुंगे, प्रीती सूर्यवंशी, अनिल बोदाडे, गौरीशंकर बुरकुल, मनीषा मेटकरी, सोमनाथ हुशारे, सावित्री कौंडूभैरी, प्रशांत गायकवाड, तरन्नुम पटेल, प्रवीण खवतोडे, सीमा बुरजे यांच्यासह नगरसेवक, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी आघाडीकडून अरुण किल्लेदार आणि भाजपकडून अजित जगताप यांची निवड करण्यात आली असून ते दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य आहेत. निवड प्रक्रियेदरम्यान तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे पक्षनेते सोमनाथ माळी व नगरसेविका अश्विनी धोत्रे गैरहजर होते.
0 Comments