डिजिटल आणि पारंपरिक प्रचाराची छाप; वंचित आघाडीने शहरात दृश्यमानता वाढवली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे २२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. पारंपरिक रिक्षा प्रचार, पदयात्रा आणि आधुनिक सोशल मीडियावरील रिल्स यांचा समन्वय करून पक्षाने शहरातील निवडणूक रिंगणात प्रभावी उपस्थिती निर्माण केली आहे.
महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून, विविध राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीने यंदा प्रचाराची वेगळी आणि प्रभावी रणनीती आखली आहे. पक्षाचे उमेदवार फक्त सभा किंवा बैठकींवर अवलंबून न राहता थेट मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्यावर भर देत आहेत.
वंचित बहुजन आघाडीने डिजिटल प्रचाराचे प्रभावी अस्त्र उपसले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उमेदवारांच्या फोटो, व्हिडिओ आणि प्रभागातील समस्या मांडणारे रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या माध्यमातून मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका आणि विकास आश्वासन पोहोचवले जात आहे.
प्रभागातील गल्लीबोळांमधून कार्यकर्त्यांसह निघणाऱ्या पदयात्रांमध्ये रिक्षावर भोंगे लावून पक्षाची गाणी व उमेदवारांचा संदेश सातत्याने प्रसारित केला जात आहे. तसेच निवडून आल्यावर कोणती विकासकामे करणार, याचा लेखी आश्वासननामा प्रत्यक्ष भेटीत मतदारांना देण्यात येत आहे.
या हायटेक प्रचारामुळे वंचित बहुजन आघाडीने शहरात मतदारांमध्ये दृश्यमानता आणि प्रभावी उपस्थिती निर्माण केली आहे.
0 Comments