मतदान यंत्र वितरण व मतमोजणी प्रक्रियेची आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. त्या अंतर्गत शहरातील विविध प्रशालांमध्ये मतदान यंत्र (ईव्हीएम) वितरण व मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
आज सोलापूर महानगरपालिका येथून कडेकोट पोलीस बंदोबस्तात व ऑन-कॅमेरा देखरेखीखाली निवडणूक मतदान यंत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रक्रियेची सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मतदान यंत्रांचे हाताळणे, वाहतूक, सुरक्षा व नोंदवही व्यवस्थेबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
यानंतर आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मेहता प्रशाला येथे उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी कक्षाची पाहणी केली. स्ट्रॉंग रूममधील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख, प्रवेश नियंत्रण, सीलिंग प्रक्रिया तसेच मतमोजणी कक्षातील बसण्याची व्यवस्था, वीजपुरवठा, अग्निशमन सुविधा व इतर आवश्यक बाबींचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
यावेळी निवडणूक नियंत्रण अधिकारी तपन डंके, विभागीय अधिकारी किशोर तळीखेडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून कामकाज सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

0 Comments