पंढरपूर डाक विभागामध्ये नवीन सहा शाखा डाकघर सुरु
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर डाक विभागामध्ये पंढरपूर , करमाळा, माढा, माळशिरस आणि सांगोला तालुक्यातील एकूण सहा ठिकाणी नवीन शाखा डाकघर कार्यालये सुरु करण्यात आली असल्याची माहिती पंढरपूर विभागाचे अधिक्षक डाकघर यांनी दिली
करमाळा तालुक्यातील आळजापूर आणि हिवरे, माढा तालुक्यातील गवळेवाडी व पंढरपूर तालुक्यातील करोळे आणि माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी तसेच सांगोला तालुक्यातील सोनलवाडी या ठिकाणच्या शाखा डाक घर कार्यालयाचा उद्घाटन समारंभ खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार नारायण आबा पाटील , आमदार उत्तमराव जानकर संबधित गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , तलाठी , ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक मुन्ना कुमार, सहा.अधिक्षक एम. एम. पाटील, करमाळा उप विभागीय डाक निरीक्षक लक्ष्मण शेवाळे ,जन तक्रार निवारण अधिकारी. राजेश शर्मा, उप विभागीय डाक निरीक्षक , योगेश चीतमुगरे हे उपस्थित होते.
नवीन पोस्ट ऑफिस मंजुर झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची सोय झाली असून पोस्ट ऑफिसच्या विविध योजना खुप फायदेशीर आहेत. पंढरपूर डाक विभागामध्ये नव्याने सुरु होणाऱ्या शाखा डाकघर कार्यालयातून ग्रामस्थांनी डाक विभागाच्या विविध बचत योजना , विविध विमा योजना , आधार सेवा ,इंडिया पोस्ट पेमेंट बँक सह पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले.
कार्यक्रमास संबधित गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात नव्याने सुरु झालेल्या पोस्ट ऑफिसमुळे नागरिकामध्ये आनंदाचे वातारण निर्माण झाले आहे.

0 Comments