सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून आता सर्वांचे लक्ष मतदान प्रक्रियेवर केंद्रित झाले आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकणाऱ्यांविरोधात पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी कठोर पावले उचलली आहेत. अवघ्या एका रात्रीत ५३ उपद्रवी इसमांना ८ जानेवारी ते १६ जानेवारीपर्यंत, म्हणजेच मतमोजणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक कार्यक्षेत्रातून तडीपार करण्यात आले आहे.
याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी गुरुवारी जारी केले. ज्यांच्यावर दोन किंवा त्यापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपींची पोलिस ठाणेनिहाय यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ५३ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी उपद्रव माजवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झालेल्या व्यक्तींवर कठोर पावले उचलण्यात येत आहेत. यापुढेही अशाच स्वरूपाची कारवाई सुरू राहील, असे पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी स्पष्ट केले.
*फौजदार चावडीत सर्वाधिक तडीपार*
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये फौजदार चावडी पोलिस ठाणे हद्दीतील १५, जेल रोड ६, एमआयडीसी १०, जोडभावी ३, सदर बाजार ११ आणि सलगरवस्तीतील ८ जणांचा समावेश आहे. तडीपारचे आदेश तात्काळ संबंधित पोलिस ठाण्यांना वितरित करण्यात आले आहेत.
*मतदानासाठी दोन तासांची सूट*
तडीपार करण्यात आलेल्या व्यक्तींना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी ठरावीक दोन तासांची सूट देण्यात आली आहे. त्या वेळेत मतदान करून त्यांनी तात्काळ कार्यक्षेत्राबाहेर जाणे बंधनकारक राहणार आहे. दिलेल्या वेळेनंतर कोणीही आढळून आल्यास त्यांच्यावर पुन्हा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकणाऱ्या आणखी ६७ जणांची दुसरी यादी तयार असून, आवश्यकतेनुसार त्यांच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.

0 Comments