Hot Posts

6/recent/ticker-posts

निवडणूक प्रचार साहित्याचे प्रमाणीकरण आवश्यक – जिल्हाधिकारी

 निवडणूक प्रचार साहित्याचे प्रमाणीकरण आवश्यक – जिल्हाधिकारी  

 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 11 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांनी प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी त्या जाहिरातींचे प्रमाणीकरण जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून करून घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले आहे. 
 
अधिसूचना व नियम
महाराष्ट्र शासनाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. 
यामध्ये खालील माध्यमांचा समावेश आहे : 
- दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या 
- यूट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क 
- आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या 
- चित्रपटगृहातील जाहिराती 
- सार्वजनिक ठिकाणचे दृकश्राव्य फलक (ऑडिओ-व्हिज्युअल डिस्प्ले) 
- ई-वृत्तपत्रे 
- बल्क एसएमएस, व्हाइस एसएमएस 
- समाजमाध्यमे (सोशल मीडिया) 
- संकेतस्थळे 
 
समितीची रचना
निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीची दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी स्थापना करण्यात आली आहे. 
- पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी
- उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख
- संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी 
- संबंधित तहसीलदार 
हे सदस्य म्हणून तर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के सदस्य सचिव म्हणून कार्यरत राहतील. 
 
अर्ज प्रक्रिया
प्रस्तावित जाहिरात प्रसारित किंवा प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या पूर्व प्रमाणनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. 
- अर्जासोबत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत जोडावी. 
- राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती जोडणे आवश्यक आहे. 
- अर्जाचा विहित नमुना महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेसोबत उपलब्ध आहे. तसेच जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणान व संनियंत्रण समिती, जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे उपलब्ध होईल.
.
आवाहन:-
जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले की, उमेदवारांनी जाहिरातींचे प्रमाणीकरण करूनच प्रचार करावा. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि आचारसंहितेचे पालन करण्यासाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक आहे. 
Reactions

Post a Comment

0 Comments