Hot Posts

6/recent/ticker-posts

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी – जिल्हाधिकारी

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी – जिल्हाधिकारी

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाच्या निर्मिती, विक्री व वापरास कोणतीही मान्यता नसून अशा प्रकारचा राष्ट्रध्वज वापरणे हे कायद्याचे उल्लंघन ठरते, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम, १९७१, तसेच ध्वजसंहिता व संबंधित शासन निर्देशांनुसार, राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकसारख्या अविघटनशील साहित्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. अशा ध्वजांचा वापर केल्याने नंतर ते रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी अथवा कचऱ्यात फेकले जाण्याचे प्रकार घडतात, जे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाला बाधा पोहोचवणारे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
राष्ट्रध्वज रस्त्यावर, मोकळ्या जागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकून देणे, फाडणे किंवा त्याची विटंबना करणे हा दंडनीय गुन्हा असून, तो बोधचिन्ह व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम अंतर्गत शिक्षेस पात्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पुढे सांगितले की, कोणतेही खराब, फाटलेले अथवा वापरास अयोग्य राष्ट्रध्वज आढळून आल्यास, ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार त्यांचा सन्मानपूर्वक नाश करणे आवश्यक आहे. असे ध्वज नागरिकांनी स्वतः नष्ट न करता, ते गोळा करून नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत, राष्ट्रध्वज फडकावताना ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करावे व राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन केले आहे. 
Reactions

Post a Comment

0 Comments