वालचंदमध्ये एचएससी विद्यार्थ्यांची कॉपीमुक्त अभियानाला शपथ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वालचंद कला व शास्त्र कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील (अनुदानित व स्वयंअर्थसहाय्य) एच.एस.सी. बोर्ड परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पस भेटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत कॉपीमुक्त अभियानाची शपथ, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, तसेच पालकांसाठी समुपदेशन सत्र घेण्यात आले.
या कार्यक्रमाला ७०० हून अधिक विद्यार्थी आणि ४०० पेक्षा जास्त पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाची सुरुवात उपप्राचार्य अनुप म्हेत्रे यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून सामुदायिक स्वरूपात कॉपीमुक्त अभियानाची शपथ घेण्यात आली.
हिराचंद कॉलेज ऑफ कॉमर्सचे एमबीए विभागप्रमुख डॉ. प्रीतम कोठारी यांनी एमबीए, बीबीए व बीसीए या अभ्यासक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. रजनी क्षीरसागर यांनी बीबीए व बीसीएच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, शुल्क रचना तसेच सीईटी परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.यानंतर डॉ. अनिता सदलगी यांनी डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग, विविध सर्टिफिकेट कोर्सेस तसेच वाणिज्य क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.
अभियांत्रिकी विभागातील डॉ. मनीषा निरगुडे यांनी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रम व भविष्यातील करिअर संधी यांची माहिती देत विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. क्वांटम कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, ऊर्जा व शाश्वत विकास यांसारख्या आधुनिक विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. एखंडे व डॉ. रविकांत नगरकर यांनी प्लेसमेंट प्रक्रिया, सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट आणि महाविद्यालयात उपलब्ध विविध कौशल्यविकास अभ्यासक्रमांविषयी उपयुक्त माहिती दिली.कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत पालकांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. के. सूर्यवंशी यांनी केले.हा उपक्रम विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि योग्य करिअर दिशा देणारा ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

0 Comments