माढा (कटूसत्य वृत्त) :- भाजपकडून माढा तालुक्यातील राजकारणात मोठा उलटफेर पाहायला मिळाला असून, आमदार तानाजी सावंत यांना राजकीय धक्का बसला आहे. त्यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत** यांना भाजपच्या वतीने मानेगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ही उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपचे नेते रणजीतसिंह शिंदे यांच्या हस्ते पृथ्वीराज सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आला.
पृथ्वीराज सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, ते मानेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे, याआधी शिवाजीराव सावंत यांच्या भाजप प्रवेशाला आमदार तानाजी सावंत यांनी विरोध केल्याचे बोलले जात होते.
काही दिवसांपूर्वी शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शिवाजीराव सावंत यांचा भाजप प्रवेश थांबवला, असा आरोपही करण्यात आला होता. तर दुसरीकडे भाजपचे नेते रणजीतसिंह शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी केले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर पृथ्वीराज सावंत यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने माढा तालुक्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, ही उमेदवारी तानाजी सावंत यांच्यासाठी मोठा राजकीय संदेश मानली जात आहे.
0 Comments