डिजिटल कंटेंट आणि पदयात्रा : भाजपच्या प्रचाराची नवी रणनीती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका निवडणुकीच्या प्रचाराने शिगेला पोहोचत असतानाच भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यावर विशेष भर दिला आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भाजपकडून मतदारांना साद घालण्यात येत असून, दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पार्क मैदानावर झालेल्या प्रचार सभेदरम्यान मकर संक्रांतीनिमित्त सोलापूरकरांना दिलेल्या शुभेच्छांची व्हिडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.
सन २०१४ पासून भाजपने सोशल मीडियावरील प्रचारात आघाडी घेतली असून, वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचे तंत्र प्रभावीपणे वापरले जात आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी तसेच पक्ष संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी थेट निवडणूक प्रचारात उतरले आहेत. शहरातील विविध चौकांमध्ये उमेदवारांनी केलेल्या विकासकामांचा प्रचार डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
या प्रचारात स्थानिक प्रश्नांबरोबरच राष्ट्रहित, विकासकामे तसेच केंद्र व राज्यातील सत्तेचे गणित मतदारांसमोर मांडण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून वॉररूमच्या माध्यमातूनही प्रचाराचे नियोजन करण्यात येत असून, कोणत्या भागात प्रचाराची गती वाढविण्याची आवश्यकता आहे, याबाबत वॉररूममधून सातत्याने मार्गदर्शन दिले जात आहे.
पदयात्रेवर भर महापालिका निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा थेट मतदारांशी संपर्क येतो. त्यामुळे पक्षाच्या चिन्हाबरोबरच उमेदवारांचे व्यक्तिमत्त्व, काम करण्याची हातोटी तसेच त्यांनी केलेले सामाजिक कार्य मतदारांकडून तपासले जाते. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांकडून प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी पदयात्रांवर विशेष भर देण्यात येत आहे.
0 Comments