Hot Posts

6/recent/ticker-posts

स्मार्ट सिटीच्या कामांवर प्रश्नचिन्ह; प्रणिती शिंदेंकडून चौकशीची मागणी

 स्मार्ट सिटीच्या कामांवर प्रश्नचिन्ह; प्रणिती शिंदेंकडून चौकशीची मागणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून विविध विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र, ही सर्व कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आल्यास सर्वप्रथम स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने शहर विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या आमदारांवर व त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. सत्ता, पैसा आणि दहशतीच्या जोरावर राजकारण करणे हा भाजपचा हातखंडा असून त्यामुळे सोलापूरमधील राजकीय वातावरण बिघडत असल्याचा आरोप त्यांनी केला. आज राजकारण करताना रक्त सांडले जात असून ही बाब सोलापूरकरांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपचे आमदार बाहेरचे लोक सोलापुरात येऊन गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप करीत असले, तरी प्रत्यक्षात पालकमंत्री हे डॅमेज कंट्रोलच्या भूमिकेत असून साम, दाम, दंड या मार्गांचा वापर करून उमेदवारांची पळवापळवी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आम्ही गोरगरिबांसाठी काम करणारे लोकप्रतिनिधी असून एका रात्रीत सत्ता मिळवण्यासाठी साम, दाम, दंडाचा वापर करणारे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला माजी आमदार नरसय्या आडम, प्रकाश यलगुलवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे शहराध्यक्ष महेश गादेकर, उद्धवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, काँग्रेसचे नेते प्रा. अशोक निंबर्गी, प्रताप चव्हाण तसेच लाल बावटाचे युसूफ मेजर शेख आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments