१५ जानेवारीला महापालिका निवडणूक; मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राज्यात सध्या महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा जोर वाढला असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येत्या दि. १५ जानेवारी रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुलभ व सुरळीत पार पडावी, यासाठी राज्य सरकारने १५ जानेवारी रोजी संबंधित ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसह पुणे, सोलापूर, नागपूर, नाशिक आदी राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांमध्ये जिथे मतदान होणार आहे, त्या सर्व ठिकाणी गुरुवारी शाळा व सरकारी कार्यालये बंद** राहणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना मतदानाचा हक्क बजावणे सुलभ होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रियेला वेग देण्यात आला असून, सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. २९ महानगरपालिकांच्या या निवडणुकांचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने डिसेंबर महिन्यात २०२६ सालातील २४ सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, त्या यादीत १५ जानेवारीच्या सुट्टीचा समावेश नव्हता. त्यामुळे ही सुट्टी फक्त ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका होत आहेत, त्या भागांपुरतीच लागू राहणार असल्याचे सरकारकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
याचबरोबर,१५ जानेवारी रोजी बँका सुरू राहणार असल्याची माहिती आहे. कारण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) त्या दिवशी बँक सुट्टीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे बँकिंग व्यवहार तसेच शेअर बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे समजते.
0 Comments