Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदान यंत्र वितरण, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्रांची आयुक्त डॉ. ओम्बासे यांची पाहणी

 मतदान यंत्र वितरण, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्रांची आयुक्त डॉ. ओम्बासे यांची पाहणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतिम टप्प्यात पोहोचली असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील मतदान यंत्र वितरण केंद्र, स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांना भेट देऊन सखोल पाहणी केली.यावेळी आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी मतदान यंत्रांचे वितरण ऑन-कॅमेरा पद्धतीने व कडक पोलीस बंदोबस्तात होत आहे की नाही, याची तपासणी केली. तसेच स्ट्रॉंग रूममधील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, प्रवेश-निर्गमन नियंत्रण, सीलिंग प्रक्रिया व २४ तास पहारा याबाबत सविस्तर माहिती घेतली. मतमोजणी केंद्रांवरील बैठक व्यवस्था, विद्युत पुरवठा, अग्निसुरक्षा, सीसीटीव्ही यंत्रणा, कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी पाहणी केली.पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा अत्यंत दक्षतेने, नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने पार पाडला जावा. मतदारांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा चालणार नसून, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.तसेच मतदान यंत्र वितरण, साठवणूक व मतमोजणीदरम्यान सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, आणि भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असेही त्यांनी नमूद केले.या पाहणीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव पडदुणे, निवडणूक निर्णय अधिकारी अंजिल मुरुड, निवडणूक निर्णय अधिकारी भैरप्पा माळी, नगर अभियंता सारिका आकूलवार,नियंत्रण अधिकारी तपन डंके, निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी, महापालिकेचे संबंधित विभागप्रमुख, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केला.

Reactions

Post a Comment

0 Comments