प्रभाग क्रमांक २६ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य फेरी
माजी आमदार दिलीप माने यांचा जनसंवाद
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कुमठे परिसरातील प्रभाग क्रमांक २६ मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार फेरीस माजी आमदार दिलीप माने यांनी उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधत भाजपच्या विकासात्मक राजकारणाची भूमिका मांडली.
या प्रभागातून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून
जाधव संगीता शंकर (अ – अनुसूचित जाती महिला),
जमादार दीपक विजय (ब – अनुसूचित जमाती),
माने जयकुमार ब्रह्मदेव (क – सर्वसाधारण)हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांच्या प्रचारासाठी ही फेरी काढण्यात आली.
प्रचार फेरीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला. यावेळी माजी आमदार दिलीप माने यांनी सोलापूर महानगरपालिकेने यापूर्वी विकासाच्या राजकारणाला नेहमीच साथ दिल्याचा उल्लेख करत, प्रभाग क्रमांक २६ च्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले की, “सोलापूर शहराने नेहमी विकासाला प्राधान्य दिले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या यांचे कायमस्वरूपी समाधान करण्यासाठी सक्षम आणि विकासाभिमुख प्रतिनिधींची गरज आहे. भाजपचे उमेदवार हे प्रभागाचा कायापालट करण्यास कटिबद्ध आहेत.”
प्रचारादरम्यान ‘कमळ’ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन उपस्थित नागरिकांना करण्यात आले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक २६ मधील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला. “प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेशी सतत संपर्क हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे उमेदवारांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण प्रचार फेरीदरम्यान भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. घोषणा, संवाद आणि विकासाचा संदेश देत ही प्रचार फेरी यशस्वीरीत्या पार पडली.

0 Comments