सोलापूर(कटूसत्य वृत्त):-महापालिकेचे ३७ वे महापौरपद गुरुवारी सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाले. महापौर पदाच्या शर्यतीत पाच जणांची नावे आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून एकाचे नाव निश्चित होणार आहे. मात्र, तूर्त दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील, असे स्पष्ट केले आहे.
महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी मुंबईत काढण्यात आली. मागील दोन टर्म विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेले हे पद यंदा सर्वसाधारण झाले. महापालिकेत भाजपचे सर्वाधिक ८७ नगरसेवक निवडून आले होते. यात प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांची
संख्या ६० आहे. महापालिकेच्या राजकारणाचा आणि सभागृह चालविण्याचा अनुभव असलेल्या नगरसेवकाला आजवर महापौर पदावर संधी मिळाली आहे. त्यामुळे २७ जणांमधून एकाला संधी मिळेल, अशी चर्चा आहे. सध्या महापौर पदासाठी सलग चार वेळा निवडून आलेले विनायक कोंड्याल, आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉ. किरण देशमुख, अनंत जाधव, नरेंद्र काळे, रंजिता चाकोते या पाच जणांची नावे चर्चेत आहेत. विनायक कोंड्याल दुसऱ्यांदा नगरसेवक.
विनायक कोंड्याल
सलग चार वेळा नगरसेवक, यंदा सर्वाधिक १४ हजार मतांनी निवडून आले. आमदार देवेंद्र कोठे यांचे भावजी. विनायक यांचे वडील रामकृष्ण हेपद्मशाली ज्ञाती संस्थेचे ट्रस्टी आणि समाजातील वाद मिटविण्यात पुढाकार घेणे पंच म्हणूनही परिचित आहेत. ज्येष्ठ नगरसेवक म्हणून भाजपचे नेते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकतात.
डॉ. किरण देशमुख
सलग दुसऱ्यांदा नगरसेवक. सलग पाचव्यांदा भाजपचे आमदार असलेले विजयकुमार देशमुख यांचे पुत्र अशी ओळख. लिंगायत समाजात दबदबा. त्यामुळे भाजप नेते त्यांच्या नावाचा आग्रह धरू शकतात. भाजप युवा संघटनेतील कामाचा अनुभव. आमदार सुभाष देशमुख गटाकडून त्यांच्या नावाला संमती मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
नरेंद्र काळे
शहराध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव. दुसऱ्यांदा नगरसेवक, धनगर समाजातून आलेला भाजपचा उच्चशिक्षित निष्ठावंत कार्यकर्ता अशी ओळख. धनगर समाजाला पालिकेच्या कॅबिनेटमध्ये आजवर फारशी संधी नाही. भाजपमधील तीन गटांसोबत समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे गटनेता आणि महापौर पदांसाठी नाव चर्चेत.
अनंत जाधव
नगरसेवक म्हणून दोन वेळा निवडून आले. मराठा समाजातून आलेला भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता. कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचे निकटवर्तीय अशी ओळख. मराठा समाजाला १९९२ नंतर महापौरपद मिळाले नाही. या मुद्दयावर मराठा संघटना आग्रही आहेत.
रंजिता चाकोते
पहिल्यांदा नगरसेविका झाल्या असल्या तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचा संपर्क ही जमेची बाजू, अक्कनबळग महिला मंडळाच्या माध्यमातून लिंगायत समाजातील महिलांचे संघटन. लिंगायत समाजातील महिलेला संधी या मुद्दयावर यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा लाभलेला आहे. यामुद्यावरही भाजप विचार करु शकते.
उपमहापौर पदासाठी
अनेकजण अनुत्सुक महापालिकेत उपमहापौर झाले की पुढच्या निवडणुकीत तो नगरसेवक म्हणून निवडून येत नाही किंवा त्याचे राजकारण संपते, असे अनेक नगरसेवकांना वाटते. त्यामुळे उपमहापौर
पदाच्या चर्चेपासून दूर राहण्याचा प्रयत्न इच्छुक मंडळी करीत आहेत.
समाजाचे समीकरणही महत्त्वाचे
१ महापौर निवडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दरवेळी वेगवेगळ्या समाजातील नगरसेवकाला संधी देण्याचा प्रयत्न केला होता. यात काही वेळा अपवादही ठरले.
2भाजपने २०१७ नंतर पहिल्या अडीच वर्षांसाठी लिंगायत समाजातील शोभा बनशेट्टी यांना तर दुसऱ्या अडीच वर्षांत पद्मशाली समाजातील श्रीकांचना यन्नम यांना संधी दिली. आता पुन्हा पद्मशाली समाजातील नगरसेवकाला संधी द्यायची का, यावरून वाद होऊ शकतो.
3 या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजप नेते महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती या पाच पदांवर संधी देण्याचा शब्द देऊन इच्छुकांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे मन वळवू शकतात.
महापौर निवडीचा अधिकार स्थानिक पातळीवर राहत नाही. आमचे वरिष्ठ नेते खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण निर्णय घेतील. जयकुमार गोरे, पालकमंत्री.
महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांची नावे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सादर होतील. त्यांच्याकडून ही नावे वरिष्ठांकडे पाठविण्यात येतील. वरिष्ठांकडूनच निर्णय येईल.
देवेंद्र कोठे, आमदार
0 Comments