शासनाच्या योजनांचा थेट लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार- चेतनसिंह केदार सावंत

सांगोला (कटूसत्य वृत्त):- चोपडी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा थेट व प्रभावी लाभ मिळावा, यासाठी कटिबद्ध राहणार असून विकासकामांत कोणताही भेदभाव होऊ दिला जाणार नाही, असा ठाम निर्धार भाजप–शिवसेना–आरपीआय महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केला. ते चोपडी गटातील राजुरी गावांतील भेटीदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते.
चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत व राजुरी पंचायत समितीचे उमेदवार सदाशिव दबडे यांनी राजुरी गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या. राजुरी गावातील श्री लक्ष्मीदेवी मंदिर व श्री महादेव मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी चोपडी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास हाच आपल्या कार्याचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते, पुढे म्हणाले की, चोपडी जिल्हा परिषद गटात रस्ते, पाणी व वीज या मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील. खराब रस्त्यांमुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना भोगाव्या लागणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी दर्जेदार रस्त्यांची कामे हाती घेतली जातील. प्रत्येक गावात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा तसेच अखंड वीज उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांशी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. चोपडी गटातील एकही कुटुंब घराविना राहू नये, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, आदी घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक पात्र कुटुंबाला पक्के घर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
याशिवाय शिक्षण व आरोग्य सुविधा बळकट करणे, महिलांचे सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार संधी, शेतकऱ्यांसाठी सिंचन व कृषीपूरक योजना, जलसंधारण, स्वच्छता, अंगणवाडी व शाळा दुरुस्ती, अंतर्गत रस्ते, पथदिवे, समाजमंदिर व स्मशानभूमी विकास या विषयांवर विशेष भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. “प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून प्रामाणिकपणे काम करत चोपडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचा संतुलित विकास साधणार आहे.” केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा निर्धार असल्याचे भाजप-शिवसेना- आरपीआय महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले. यावेळी महेश कारे, सुनील खुळे, दत्तात्रय गायकवाड, भाऊसाहेब जुजारे, नेताजी काटे, बाळासाहेब बिसले, मोहन बाबर, अंकुश खुळे, आत्माराम काटे, गजानन काटे, सत्यजित काटे, विनायक बंडगर, जावेद पटेल, प्रकाश बिसले, तानाजी चौंडे, मनोज बरगर, तुकाराम सुरवसे, रामचंद्र माने, महावीर काटे, दिलीप बंडगर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
0 Comments