सोलापूर भाजपात सत्तासंघर्ष; महापौरपदावरून कोठे–देशमुख आमनेसामने
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापौरपद भाजपकडेच जाणार, हे निश्चित असतानाही आता महापौर निवडीवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सुभाष देशमुख व विजय देशमुख या दोन्ही गटांमध्ये महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकूण ८७ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे भाजपचाच महापौर होणार, याबाबत कोणतीही शंका नाही. मात्र, महापौर कोण होणार यावरून पक्षातील दोन प्रभावी गट आमनेसामने आले आहेत.
आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या गटातील विनायक कोंडय़ाल यांना महापौरपदाच्या खुर्चीत बसवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे, उमेदवार निवडीत डावलल्याचा ठपका ठेवत आमदार सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांनी कोठे गटाविरोधात दंड थोपटले असून, त्यांच्या गटातून डॉ. किरण विजयकुमार देशमुख यांच्या नावासाठी ते आग्रही आहेत.
भाजपमधील या अंतर्गत संघर्षामागे घराणेशाहीचा मुद्दा ही चर्चेत आहे. दिवंगत विष्णुपंत कोठे यांच्या काळापासून सोलापूर महापालिकेवर कोठे घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. आमदार देवेंद्र कोठे यांना हीच परंपरा पुढे चालवायची असल्याचे बोलले जात असून, त्यांच्या गटाचे ४१ नगरसेवक असल्याने “आम्ही सांगू तोच महापौर” असा दावा कोठे समर्थकांकडून केला जात आहे.
दुसरीकडे, देशमुख गटाने मात्र सर्व नगरसेवकांचे मत विचारात घेऊनच उमेदवार ठरवा, अशी ठाम भूमिका घेतली आहे. पक्षाने घराणेशाहीला विरोध दर्शविल्यास बिज्जू प्रधाने, अनंत जाधव, नरेंद्र काळे, रंजिता चाकोते यांच्याही नावांचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्व कोणाची बाजू घेणार, महापौरपदासाठी तडजोड होणार की संघर्ष तीव्र होणार, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. महापौर निवडीचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत या रस्सीखेचीचे चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.



.png)
0 Comments