क्रिडाई कोल्हापूरतर्फे ‘दालन २०२६’ वास्तू-बांधकाम प्रदर्शनाचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्रिडाई कोल्हापूरतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे वास्तू व बांधकाम विषयक प्रदर्शन ‘दालन २०२६’ येत्या ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महालक्ष्मी दरबार हॉल ग्राउंड, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संदीप बोरचाटे यांनी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास खासदार छत्रपती शाहू महाराज, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री हसन मुश्रीफ आमदार, मंत्री, प्रशासकीय अधिकारी व क्रिडाईचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनाचे हे १३ वे वर्ष असून यंदा १७० हून अधिक स्टॉल्स सहभागी होत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक, साहित्य उत्पादक व सेवा पुरवठादार या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
प्रदर्शनाच्या काळात विविध तांत्रिक सेमिनार्स आयोजित करण्यात आले आहेत. रविवार दि. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता विद्यार्थ्यांसाठी प्रा. एम. जी. गाडगीळ (मुंबई) यांचे व्याख्यान होणार आहे.
१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता अभ्युदय गोडबोले (केमिकल इंजिनिअर) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता समारोप कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आणि इतर अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ग्राहकांना एका छताखाली नवीन गृहप्रकल्प, बांधकाम तंत्रज्ञान, गृहकर्ज, इंटिरिअर, सोलर सिस्टिम, एलिव्हेटर, टाइल्स आदींची माहिती मिळणार असून घर खरेदीसाठी योग्य संधी उपलब्ध होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस क्रिडाई कोल्हापूरचे पदाधिकारी सुनील चिले, मौक्तिक पाटील, अक्षय जव्हेरी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
.png)
0 Comments