Hot Posts

6/recent/ticker-posts

विकसित सोलापूरच्या स्वप्नपूर्तीसाठी १०२ उमेदवारांना विजयी करा- प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

 विकसित सोलापूरच्या स्वप्नपूर्तीसाठी १०२ उमेदवारांना विजयी करा- प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण




 भाजपाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेची ही निवडणूक सोलापूरचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपाच्या सर्व १०२ उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी जुळे सोलापुरातील जामगोंडी मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा उत्साहात झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे, शिवराज सरतापे, सुधा अळीमोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारतीयांनी २०४७ साली विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला 'शत प्रतिशत' च्या दिशेने घेऊन जाणे आवश्यक आहे. विकसित भारताच्या पर्यायाने विकसित सोलापूरच्या जडणघडणीत सोलापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांनी चालणारी सत्ता सोलापुरातही आणायची आहे.

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागामध्ये दररोज १० तास पक्षासाठी देऊन प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडावी. केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या योजना मतदारांपर्यंत जाऊन त्यांना सांगाव्यात. आणि कमळ चिन्हाला पर्यायाने भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करावे. शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर ५०% हून अधिक मते भारतीय जनता पार्टीला मिळवण्यासाठी प्रयत्नशील रहावे.

भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांच्या समर्पणातून तयार झालेला पक्ष आहे. या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांच्या महत्त्वकांक्षा आहेत. ज्यांना या निवडणुकीत संधी मिळाली नाही त्यांना आगामी काळात केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच सोलापूर महानगरपालिकेत विविध ठिकाणी संधी मिळू शकते. त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी नाराज न होता ज्यांना उमेदवारी मिळाली आहे अशा भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, यंदाच्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून आणू. २०१७ च्या तुलनेत रेकॉर्डब्रेक जागा या निवडणुकीतून निवडून येतील. कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवावे, असेही आमदार विजयकुमार देशमुख याप्रसंगी म्हणाले.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, सोलापूरच्या दररोजच्या पाणी पुरवठ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेली ८९२ कोटी रुपयांची योजना, आयटी पार्क ला मंजुरी, सोलापूरहुन मुंबई आणि गोव्याला सुरू झालेली विमानसेवा आणि प्रस्तावित असलेली तिरुपती, बंगळुरू विमानसेवा, पुढील १०० दिवसांत सुरू होणाऱ्या १०० ई बस अशा विकास कामांमुळे सोलापूरकरांचा भाजपला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भाजपाचे शहरातील सर्व कार्यकर्ते दिवस रात्र एक करून सर्व १०२ उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.
Reactions

Post a Comment

0 Comments