कर्णिक नगर विकासासाठी महाविकास आघाडी : प्रणिती शिंदे
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- कर्णिक नगरसह प्रभाग क्रमांक ९ च्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीने सक्षम, समाजभान असलेले आणि सातत्याने कार्यरत उमेदवार दिले आहेत. सामाजिक प्रश्नांची जाण असलेले अॅड. सुरेश गायकवाड, दत्तू बंदपट्टे, गीता वासम आणि अरुणा आडम हेच कर्णिक नगरमधील समस्या प्रभावीपणे सोडवू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच विजयी करा, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
रविवारी कर्णिक नगर येथील पावन गणपती मंदिराजवळ आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सांगितले की, कर्णिक नगर परिसरात मूलभूत सुविधांपासून ते सामाजिक प्रश्नांपर्यंत अनेक समस्या प्रलंबित आहेत. या समस्या सोडवण्यासाठी जनतेशी थेट संपर्क ठेवणारे, कार्यक्षम आणि अनुभवी लोकप्रतिनिधी आवश्यक आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार हे केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर सातत्याने जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत.
या सभेला माजी आमदार नरसय्या आडम, शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, अशोक कलशेट्टी, कर्णिक नगरचे चेअरमन थावरू राठोड, अशोक काजळे, जमादार, पावन गणपती मंदिराचे अध्यक्ष सुनील जाधव, एकता नगरचे अध्यक्ष व निवृत्त पोलीस अधिकारी विष्णू माने, प्रभाकर यादगिरी, अशोक ठोंगे-पाटील, व्यंकटेश कोंगारी, अनिल वासिम, कामिनी आडम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा दर्शविला. सभेच्या शेवटी उपस्थितांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

0 Comments