आ. देवेंद्र कोठेंना अमोल शिंदेंचे ओपन चॅलेंज - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 12, 2026

आ. देवेंद्र कोठेंना अमोल शिंदेंचे ओपन चॅलेंज

 आ. देवेंद्र कोठेंना अमोल शिंदेंचे ओपन चॅलेंज




‘सगळ्या तालमी आमच्यासाठी खमक्या; आता तू फक्त तुझी काळजी कर…’ – अमोल शिंदे
लोकांच्या डोळ्यात पाणी आहे, पण नळाला पाणी नाही.
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला असून, निवडणुकीला अवघे चार दिवस उरलेले असतानाच महायुतीमधील घटक पक्षांतील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपचे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांना जाहीरपणे ओपन चॅलेंज दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

“यापुढच्या काळात तुझी आणि माझी गाठ सोलापूर शहर मध्य मतदारसंघात १०० टक्के आहे. आता तू फक्त तुझी काळजी कर,” असे थेट आव्हान अमोल शिंदे यांनी आमदार कोठे यांना दिले.

अमोल शिंदे म्हणाले की, सोलापूरकरांनी यापूर्वी काँग्रेसची सत्ता पाहिली आणि गेली नऊ वर्षे भाजपची सत्ता अनुभवली. मात्र, आजही शहरातील नागरिकांना नियमित पाणी मिळालेले नाही. “लोकांच्या डोळ्यात पाणी आहे, पण नळाला पाणी नाही, हीच सोलापूरकरांची अवस्था आहे,” अशी टीका त्यांनी भाजपवर केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना–राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.

महापालिकेच्या लढाईत भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता कुठेच दिसत नसल्याचा आरोप करताना शिंदे म्हणाले, “भाजपने त्यांच्या निष्ठावंत उमेदवारांची तिकीटे आधीच कापली. उपऱ्यांना पक्षात आणून आमच्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे करत आहेत.” मागील महापालिका निवडणुकीत शहर मध्यचे विद्यमान आमदार आमच्याच जीवावर या प्रभागातून निवडून आले होते, असा दावाही त्यांनी केला.

शिंदे म्हणाले की, “आमदार कोठे यांच्या नावाची या प्रभागात अवघी अकरा मते आहेत. तरीही मुस्लिम, मराठा, धनगर अशा सर्व समाजांनी त्यांना मागील निवडणुकीत डोक्यावर घेतले आणि निवडून आणले. म्हणूनच ते आज आमदार झाले. आता मात्र ते प्रभाग क्रमांक सातमध्ये मीच उमेदवार असल्याचे सांगत आहेत.”

“प्रभाग सातमधील खरी लढाई ही आमदार देवेंद्र कोठे आणि अमोल शिंदे यांच्यातच होणार आहे,” असे सांगत शिंदे यांनी पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिले. “तुमची जेवढी ताकद आहे, तेवढी लावा. मी माझ्यासोबत असलेल्या मायमावल्या, वडीलधारी मंडळी आणि कार्यकर्त्यांची ताकद लावतो,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

गेल्या चार दिवसांपासून शिवसेना–राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्रास दिला जात असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. “विविध शासकीय यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या आमच्या लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. ‘तुझ्या भावाची बदली करीन, तुझ्या माणसाला सस्पेंड करीन’ अशा धमक्या दिल्या जात आहेत. हा लोकशाही प्रक्रियेचा अपमान आहे,” असे ते म्हणाले.

शहर मध्यच्या आमदाराच्या हस्तक्षेपामुळे भाजपचेच नुकसान झाले असून लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या निवडणुका वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. “प्रभाग सातमधील जनता हुशार आहे. कोण लोकांसाठी रस्त्यावर उतरतो आणि कोण भांडण लावून राजकारण करतो, हे जनतेला चांगलेच माहिती आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

‘आता गाठ शहर मध्य मतदारसंघात’
“प्रभाग सातमधून आम्ही निवडून येणारच. पण यापुढच्या काळात तुमची आणि माझी गाठ सोलापूर शहर मध्य मतदारसंघात आहे, हे १०० टक्के निश्चित आहे. आमच्या सर्व तालमी आमच्यासाठी खमक्या आहेत. आता फक्त तुझी काळजी कर,” असा इशारा देत अमोल शिंदे यांनी आपले भाषण संपवले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages