पिंपरी-चिंचवडसारखा विकास हवा असेल तर राष्ट्रवादीच पर्याय – सुनील तटकरे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पायाभूत सुविधांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या पिंपरी-चिंचवडचा झपाट्याने झालेला विकास हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीचे फलित आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर तेथे नागरिकीकरण व औद्योगीकरण वाढत गेले आणि शहराने वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, सोलापूरमध्ये असा विकास का झाला नाही, असा सवाल उपस्थित करत आता सोलापूरच्या सर्वांगीण विकासाची वेळ आली असल्याचे सांगून पिंपरी चिंचवडचे विकास मॉडेल सोलापुरात राबविण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी केले.
शुक्रवारी, गांधी नगर येथील हेरिटेज येथे महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात तटकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषीमंत्री तथा पक्षाचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे हे होते. यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री, प्रा. श्रीनिवास कोंडी, नजीब शेख, प्रमोद भोसले, आनंद मुस्तारे, मकबूल मोहोळकर, वसीम बुर्हाण, तौफिक शेख, चंद्रकांत दायमा, सुहास कदम, सुशील बंदपट्टे, चित्रा कदम उपस्थित होते. प्रारंभी शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रास्ताविक तर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वागत केले. सुरूवातीला राष्ट्रवादीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन तटकरे व भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील बंद पडलेली सिटीबस सेवा व प्रवासी सुविधा पुन्हा सुरू करायच्या असतील तर राष्ट्रवादीच पर्याय असल्याचे सांगून शहरातील रिंग रोडसह अपूर्ण राहिलेली सर्व विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला साथ द्यावी.
राष्ट्रवादीच्या निवडणूक जाहीरनाम्यात शहराच्या विकासाचे नवे मॉडेल मांडण्यात आले असून पुढील पाच वर्षांत त्यातील सर्व मुद्दे पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. विरोधकांच्या कोणत्याही आमिषांना बळी न पडता स्वाभिमान जागृत ठेवून राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारमध्ये महायुतीला साथ देण्याचा निर्णय हा केवळ राज्याच्या आणि जनतेच्या विकासासाठीच घेतला असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, लोकसभेतील संघर्षानंतर सुरू केलेल्या विविध योजनांमुळे विधानसभेला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला. सोलापूर शहर हे अजितदादांवर प्रेम करणारे असून ते विश्वासार्ह व कार्यकुशल नेतृत्व असल्याचेही तटकरे यांनी नमूद केले.
यावेळी संपर्कमंत्री भरणे व चाकणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. शेवटी अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. या सर्वांचे तटकरे यांनी स्वागत केले.आभार आनंद मुस्तारे यांनी मानले.

0 Comments