सोलापूर महानगरपालिका मतदान प्रक्रिया प्रशिक्षण यशस्वी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर आज मतदान प्रक्रिया कशी राबविण्यात येणार आहे, याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सखोल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण हुतात्मा स्मृती मंदिर व द हेरिटेज मंगल कार्यालय येथे पार पडले.या प्रशिक्षण कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मतदान प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्र उभारणी, मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, मतदारांची ओळख तपासणी, ईव्हीएम व मशीनचा योग्य वापर, मॉक पोल प्रक्रिया, मतदानाच्या दिवशी अनुसरण्यात येणाऱ्या नियमावली, तसेच आकस्मिक परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.डॉ. सचिन ओम्बासे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “मतदान प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा आहे. प्रत्येक मतदाराला निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी समन्वयाने आणि नियमांचे काटेकोर पालन करून काम करणे आवश्यक आहे.”यावेळी प्रशिक्षणास संबंधित विभागांचे अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय कर्मचारी, झोन अधिकारी व इतर निवडणूक कामकाजाशी संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी टाळण्यास तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत होणार आहे.सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, निवडणूक अधिकारी-४ श्रीमती अंजली मुरोड,निवडणूक अधिकारी-५ अभिषेक देशमुख, रजाक पेंडारी आदी मान्यवर उपस्थिती होते.

0 Comments