लोणी काळभोरमध्ये ‘विश्वराज आरडीपीएल’च्या दहाव्या पर्वाला दिमाखदार सुरुवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 6, 2026

लोणी काळभोरमध्ये ‘विश्वराज आरडीपीएल’च्या दहाव्या पर्वाला दिमाखदार सुरुवात

 लोणी काळभोरमध्ये ‘विश्वराज आरडीपीएल’च्या दहाव्या पर्वाला दिमाखदार सुरुवात




 

लोणी काळभोर ( प्रविण शेंडगे )
(कटूसत्य वृत्त):-  (पुणे) येथे आज, सोमवार दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी, पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन ( पीएचडीए ) यांच्या वतीने आयोजित विश्वराज डॉक्टर्स प्रीमियर लीग ( आरडीपीएलच्या ) २०२६ या डॉक्टरांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या दहाव्या पर्वाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. डिझायर स्पोर्ट्स क्लब ग्राउंड वर झालेल्या या सोहळ्याने आरडीपीएल च्या इतिहासात आणखी एक संस्मरणीय अध्याय जोडला.

दरवर्षी एक सामाजिक संदेश घेऊन साजऱ्या होणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे पर्व महिला सक्षमीकरणाला समर्पित करण्यात आले आहे. नुकत्याच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय महिला क्रिकेट संघाने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ ही थीम निवडण्यात आली.


उद्घाटन समारंभास जागतिक महिला पॉवरलिफ्टर डॉ. शर्वरी इनामदार आणि सलग पाच वेळा आयर्नमॅन पूर्ण करणाऱ्या डॉ. स्मिता झांजुर्णे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी रंगत लाभली.

              स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर असणाऱ्या विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती कराड, विल्लु पूनावाला मेमोरियल हॉस्पिटलचे सीओओ डॉ. लजपत राय आर्य, सह्याद्री हॉस्पिटल हडपसरचे युनिट हेड डॉ. अभिजीत शिवणकर, आरडीपीएल २०२६ चे पॅट्रन व पंक्रोषीतील नामांकित फिसिशियन डॉ. डी. एन. हांबिरे, लोटस हॉस्पिटल मांजरीचे संचालक डॉ. रविंद्र शिंदे, शिवम हॉस्पिटलचे संचालक डॉ. टी. आर. जाधव, मांजरी मेडिकल डॉक्टर असोसिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष डॉ. तानाजी हंबीर, तसेच प्रतिष्ठित हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोज कुंभार, यांची प्रमुख उपस्थिती होती.

               याशिवाय पीएचडीए चे अध्यक्ष डॉ. राहुल काळभोर, क्रीडा प्रमुख डॉ. सुयोग काळभोर, उपाध्यक्षा डॉ. मोहिनी भोसले, कोषाध्यक्ष डॉ. नितीन तांदळे आणि विश्वराज आरडीपीएलचे अध्यक्ष डॉ. ओमकुमार हलिंगे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.सुत्रसंचालन डॉ. अनिल देशपांडे यांनी केले.

              उद्घाटनाच्या सुरुवातीला स्पर्धेतील संघांच्या जर्सीचे अनावरण, त्यानंतर स्पर्धेच्या विविध चषकांचे अनावरण करण्यात आले. पहिल्या सामन्यातील खेळाडूंची ओळख करून देण्यात आली आणि राष्ट्रगीताने वातावरण भारावून टाकले. पुढे मान्यवर पाहुण्यांना प्रत्येकी दोन चेंडू टाकण्याची व खेळण्याची संधी देण्यात आली. या अनोख्या उपक्रमामुळे खेळाडू आणि पाहुण्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली.

यावेळी बोलताना डॉ. शर्वरी इनामदार यांनी शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक कणखरपणाचे महत्त्व अधोरेखित केले. “आरोग्याच्या बाबतीत स्त्री-पुरुष असा भेद नसतो. आव्हान म्हणून खेळाकडे पाहिलं, तर यश नक्की मिळतं,” असा संदेश त्यांनी दिला. राष्ट्र गीत झाल्यानंतर मैदानावरच पुरुष खेळाडूंना पुश-अप्सचे आव्हान देत त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले.

डॉ. स्मिता झांजुर्णे यांनी आपला प्रेरणादायी प्रवास उलगडताना सांगितले की, घर आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत, योग्य वेळेचे नियोजन आणि ठाम इच्छाशक्तीच्या जोरावर आयर्नमॅनसारखे आव्हान पूर्ण करणे शक्य झाले. “प्रत्येकाकडे दिवसाचे २४ तासच असतात, प्रश्न असतो तो त्याचा उपयोग कसा करतो याचा,” असे त्या म्हणाल्या.
पुर्व हवेली डॉक्टर्स असोशीयनचे अध्यक्ष डॉ राहुल काळभोर यांनी असोशीयशन तर्फे केले जाणारे सामाजिक कार्य, सांस्कृतीक कार्यक्रम, वृक्षारोपण यांची माहिती दिली. तसेच आताच झालेल्या पुणे डॉक्टर्स असोशीयन तर्फे घेतलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत व एन पी एल या क्रिकेट स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवल्या बदल (पीएचडीए) शिवाजीयन्स संघाचे अभिनंदन केले.

या उद्घाटन सोहळ्याला पीएचडीएचे पदाधिकारी, आयोजन समितीचे सदस्य, विविध रुग्णालयांतील डॉक्टर खेळाडू , पत्रकार आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुसज्ज मैदान, आकर्षक थीम, नियोजनबद्ध मांडणी आणि उत्तम व्यवस्थेमुळे आरडीपीएल ही स्पर्धा डॉक्टरांच्या क्रिकेट विश्वातील ‘पंढरी’ म्हणून का ओळखली जाते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

दहाव्या पर्वात पदार्पण करणाऱ्या या स्पर्धेबाबत उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह असून, विश्वराज आरडीपीएल पुढील अनेक वर्षे अशाच जोमाने सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages