केळी पिकाविरोधात शुगर लॉबीचे षडयंत्र सुरू; शेतकऱ्यांच्या एकजुटीतून शासनदरबारी लढा उभारणार – संजय कोकाटे
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-
केळी हे देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळवून देणारे, रोजगारनिर्मिती करणारे व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे पीक असून, त्याच केळी पिकाविरोधात साखर कारखानदारीशी संबंधित शुगर लॉबीकडून सुनियोजित षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी केला. शेतकऱ्यांच्या एकजुटीतून शासनदरबारी ठाम भूमिका मांडण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्यात येणार असून, शेतकरीहितासाठी निर्णायक लढा उभारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्हा बनाना असोसिएशन यांच्या वतीने टेंभुर्णी येथे केळी उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
कोकाटे पुढे म्हणाले की, “साखर कारखानदारीतील वर्षानुवर्षांची पिळवणूक पाहता शेतकऱ्यांसाठी केळी पीक वरदान ठरले आहे. केळीमुळेच अनेक भागांचा विकास झाला असून शेतकऱ्यांना सुबत्ता आली आहे. देशात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ म्हणून केळीचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे या पिकाचे अस्तित्व धोक्यात येईल, असे कोणतेही निर्णय होऊ देणार नाही.”
येणाऱ्या अधिवेशनात केंद्रीय कृषीमंत्री यांची भेट घेऊन सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतकरी संघटित होईपर्यंत कुणीही गांभीर्याने दखल घेत नाही. त्यामुळे आता संघटन हीच खरी ताकद आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
केळी उत्पादक शेतकऱ्यांचा स्वतंत्र फोरम स्थापन करून केळीला प्रति किलो १३ रुपयांपेक्षा कमी दर मिळणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असे जाहीर करताना कोकाटे म्हणाले की, वेळोवेळी निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांचा दबावगट कार्यरत केला जाईल. “केळी पीक टिकले पाहिजे, वाढले पाहिजे; अडचणीच्या काळात सर्वांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
यावेळी तिसऱ्या आघाडीचे नेते रावसाहेब देशमुख म्हणाले की, “ऊस शेतीतून होणाऱ्या पिळवणुकीतून केळी पिकाने शेतकऱ्यांना बाहेर काढले आहे. या पिकामुळे अनेक कुटुंबे उभी राहिली आहेत. अडचणी असल्या तरी त्यावर मात करण्यासाठी संघटन अत्यावश्यक आहे.”
चर्चासत्रात आदीनाथ कारखान्याचे संचालक दादासाहेब पाटील, किरण चव्हाण, रमेश पाटील, सोमनाथ कदम, योगेश शेळके, विष्णू पोळ, स्वप्नील पाटील, संतोष ताटे, किशोर नवले, अभय माळी आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष सुरज देशमुख, जिल्हा बनाना असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ गायकवाड, विनोद पाटील, सचिव पंकज जाधव, यशवंत भोसले, तात्या गोडगे, बाबू जहागीरदार, विलास पाटील, युवा नेते यशपाल लोंढे, संतोष कदम, सागर तळेकर, सागर मगर, बळीराम जाधव, भारत खूपसे, अजिंक्य देशमुख, अनिल तोडकर, देवा गोडसे, विठ्ठल कोळपे, संजय डोके, सोनू पाटील, गोरख देशमुख, विठ्ठल मस्के, संदीप माने, डॉ. दत्तात्रय बागडे, महेश पाटील, अमोल चिंतामण, बापू चिंतामण, योगेश गोळे यांच्यासह सोलापूर व शेजारील जिल्ह्यांतील केळी उत्पादक शेतकरी, विक्रेते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन राजू पाटील यांनी केले तर आभार बालाजी पाटील यांनी केले

0 Comments