भर कोर्टात जीवे मारण्याची धमकी
करजगीवर कारवाई व जामीन रद्द करण्याची डॉ. आडके यांची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापुरातील बहुचर्चित १३७ एकर जुनी मिल भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कुमार शंकर करजगी यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात भर कोर्टात अर्जदार व सामाजिक कार्यकर्ते डॉ. संदीप आडके यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी घडली असून, यामुळे कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली होती.
प्राप्त माहितीनुसार, कुमार करजगी हे जुनी मिल बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती ट्रस्टच्या कामानिमित्त धर्मादाय आयुक्त कार्यालयात उपस्थित होते. यावेळी अर्जदार व सदर ट्रस्टचे सचिव असलेल्या डॉ. संदीप आडके यांना त्यांनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार भर कोर्टात घडल्याने तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.
कुमार करजगी हे डिसेंबर २०१७ पासून जुनी मिल भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या सशर्त जामिनावर बाहेर आहेत. जामिनाच्या अटींचा भंग केल्याप्रकरणी डॉ. संदीप आडके यांनी यापूर्वीच त्यांचा जामीन रद्द व्हावा यासाठी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानंतर दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाच्या अटी शिथिल न करता, पोलीस आयुक्तालय व न्यायालयात नियमित हजेरी, संबंधित जागेचे कोणतेही व्यवहार न करणे तसेच कोणावरही दबाव न टाकण्याच्या स्पष्ट अटी घातल्या होत्या.
विशेष बाब म्हणजे, यापूर्वी जामिनाच्या अटी मोडल्याची कबुली स्वतः कुमार करजगी यांनी न्यायालयात शपथपत्राद्वारे दिली होती आणि यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणार नाही, अशी हमीही दिली होती. असे असतानाही भर कोर्टात जीवे मारण्याची धमकी देणे हे थेट न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन असल्याचा आरोप डॉ. आडके यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. संदीप आडके यांनी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडे लेखी तक्रार करून कुमार करजगी यांचा जामीन तात्काळ रद्द करून त्यांना कारागृहात पाठवावे, अशी ठाम मागणी केली आहे. तसेच आज कुमार करजगी पोलीस मुख्यालयात संबंधित प्रकरणात हजेरी लावण्यासाठी आले असताना, हा गंभीर प्रकार त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) राजन माने यांच्या निदर्शनासही आणून दिला आहे.
भर न्यायालयात झालेल्या या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments