Hot Posts

6/recent/ticker-posts

पराभवाने खचू नका, जनसामान्यांचा आवाज बनून काँग्रेस मजबूत करा- खा. प्रणिती शिंदे

पराभवाने खचू नका, जनसामान्यांचा आवाज बनून काँग्रेस मजबूत करा- खा. प्रणिती शिंदे



महानगरपालिका निवडणुकीत भाजप नव्हे, EVM निवडून आला आहे– मोहन जोशी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची, कार्यकर्त्यांची आढावा बैठक सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी मोहन जोशी, खासदार प्रणिती शिंदे यांच्या व प्रमुख नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत पार पडली.

या बैठकीचे प्रास्ताविक शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले. तसेच महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक काळातील अनेक विषयांवर आपले विचार व्यक्त केले.

या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी उमेदवार व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पराभवाने खचून न जाता नव्या जिद्दीने उभे राहण्याचे आवाहन केले. जनमाणसांचा आवाज बनून संघर्ष करत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी पुन्हा कामाला लागावे, असे त्यांनी स्पष्ट केले. “काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच मी खासदार आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी पक्षनिष्ठेवर भर दिला. सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक चुकीच्या निर्णयावर आणि अन्यायकारक धोरणांवर निर्भीडपणे भूमिका मांडण्याचे आवाहन करत, पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच सल्लागार समिती स्थापन केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. प्रत्यक्ष मैदानात उतरून लढणारेच खरे कार्यकर्ते असून त्यांनाच पुढील काळात अधिक ताकद दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेने मतांच्या माध्यमातून दिलेला आशीर्वाद महत्त्वाचा असल्याचे सांगत खासदार शिंदे म्हणाल्या की, निवडणुकीत पराभव झाला तरी पराभूत उमेदवारांनी शॅडो नगरसेवक म्हणून काम करत जनतेचा आवाज बनावे. नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात, केलेले कष्ट वाया जाऊ देऊ नयेत आणि पुन्हा जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपचे नगरसेवक जनतेची कामे करण्यात अपयशी ठरत असल्याने लोकांना काँग्रेसची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप न करू शकलेली कामे काँग्रेसने करावीत, लोकांच्या हक्कांची लढाई लढावी आणि लोकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, असे त्यांनी नमूद केले. “अती तिथे माती. जेवढ्या जोराने वर गेले, तेवढ्याच जोराने खाली येतात. भाजपची ती वेळ आता सुरू झाली आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस हा तळागाळातील लोकांचा पक्ष असून काँग्रेस संपलेली नाही आणि कधीच संपणार नाही, असे सांगत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आपल्या कुटुंबाचा भाग असल्याची भावना दिली. “मी सदैव तुमच्या सोबत आहे,” असेही त्या म्हणाल्या.
निवडणुकीच्या संदर्भात बोलताना खासदार शिंदे यांनी सांगितले की, भाजपची निवडणूक लढाई ही सत्तेसाठी होती, तर काँग्रेसची लढाई ही तत्त्वांसाठी होती. “लढून हरणे केव्हाही चांगले असते. आम्ही लोकांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी आणि विकासासाठी लढलो. आम्ही लढलोच नाही, असा संदेश जाणे चुकीचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या विजयापेक्षा काँग्रेसच्या पराभवाचीच अधिक चर्चा होत असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, काँग्रेसचे अनेक उमेदवार निवडणुकीपूर्वीच्या सर्व्हेमध्ये आघाडीवर होते. मात्र EVM घोटाळा, पैसा आणि सत्तेचा दुरुपयोग यामुळे भाजपचे उमेदवार निवडून आल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या नऊ–दहा वर्षांतील भाजपचा भ्रष्टाचारी कारभार, टेंडरमधील टक्केवारी, नाकर्तेपणा, अघोषित आणीबाणीचे वातावरण आणि धार्मिक तेढ निर्माण करून सत्तेचा गैरवापर करण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.
या निवडणुकीत सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे संघर्ष केला असून, सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा एक आश्वासक चेहरा म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच या निवडणुकीत सहकार्य करणारे सर्व समाजबांधव, मतदार बंधू-भगिनी आणि दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
“मी जाती-धर्माच्या नावावर मत न मागता विकासासाठी मते मागितली. त्यामुळे पराभवाने खचून न जाता आपण सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करू,” असे सांगत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला नव्याने उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला. सत्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच राहील. पराभवाने खचून न जाता पुढील लढाई ताकदीने लढणे हाच काँग्रेस पक्षाचा बाणा असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप नव्हे, EVM निवडून आला आहे. – मोहन जोशी यांचा आरोप

सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रभारी मोहन जोशी यांनी सत्ताधारी भाजप आणि निवडणूक प्रक्रियेवर जोरदार टीका केली. “भाजप निवडून आलेला नाही, तर EVM निवडून आला आहे,” असा आरोप करत त्यांनी प्रभाग रचना, मतदार यादी आणि EVM यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचे सांगितले. सर्व शासकीय यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचा गैरवापर करून भाजपने विजय मिळवला असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोहन जोशी म्हणाले की, या निकालानंतर खचून न जाता नव्या जोमाने पक्षाची संघटना उभी करण्याची सुरुवात करा. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. पुढील काळात चांगल्या, निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण करणे अत्यंत गरजेचे असून, त्यासाठी लवकरच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पालकमंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या जीवावर मोठे झालेले नेते आज काँग्रेसवरच टीका करत आहेत. त्यांचे प्रस्थ काँग्रेसमुळेच निर्माण झाले असून, भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा जास्त निष्ठा दाखवण्यासाठी ते खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. अशा टीकेला योग्य आणि ठोस उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
आपले नेते राहुल गांधी देशभर संघर्ष करत असून, येणारा काळ हा काँग्रेसचा आहे. काँग्रेसचे भविष्य उज्वल असून भाजपची वाटचाल आता संपण्याकडे सुरू झाली आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत मोहन जोशी यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने आणि निर्धाराने पुढील लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

यावेळी शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी महापौर संजय हेमगड्डी, अरिफ शेख, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, प्रवीणदादा निकाळजे, नरसिंग कोळी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, भटक्या-विमुक्त विभाग अध्यक्ष युवराज जाधव, प्रवक्ते सेल अध्यक्ष नागनाथ कदम, शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापूर, उत्तर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोढे, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते, भारती ईपलपल्ली, एन. के. क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे, अशोक कलशेट्टी, शुभांगी जाबा, महानंदा शिरसीकर, संघमित्रा चौधरी, प्रणा बंगाळे, दत्तू बंदपट्टे, प्रीती देवकते, कल्पना रव्वा, धोंडप्पा तोरणगी, खुद्दुसिया मणियार, नसीम खलिफा, शहजादिबेगम बडेपीर, शोहेब महागामी, सपना म्यागेरी, कल्पना नरोटे, बिलकिसबानो सलीम खान, सीमाताई यलगुलवार, परशुराम सतारवाले, शुभांगी लिंगराज, अयाज आळंद, विजयलक्ष्मी काळपगार, शिवशंकर अंजनाळकर, अझरुद्दीन शेख, प्रतीक्षा निकाळजे, किरण टेकाळे, अर्चना जाधव, राजनंदा डोंगरे, दिपाली शहा, राजू चव्हाण, सरस्वती आठवले, रविकुमार यलगुलवार, नितीन घुगे, हासिब नदाफ, अनिल मस्के, राजन कामत, लखन गायकवाड, नागेश म्याकल, डॉ. आप्पासाहेब बगले, वशिष्ठ सोनकांबळे, दिनेश म्हेत्रे, सुभाष वाघमारे, राजेश झांपले, सागर उबाळे, भीमराव शिंदे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, माजी महिला काँग्रेस अध्यक्षा सुमन जाधव, करीमुनिसा बागवान, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, उपेंद्र ठाकूर, ज्योती गायकवाड, सलीमा शेख, पूजा चव्हाण, छाया हिरवटे, नूरअहमद नालवार, दशरथ सामल, पुरुषोत्तम श्रीगादी, कालिदास काळपगार, सुनील सारंगी, शुभम एकलदेवी, तौसीफ शेख, अजीम शेख, माजिद शेख, नागनाथ बंगाळे, आकाश झांबळे, चंद्रकांत टिक्के, शिवाजी साळुंखे, मोहसीन फुलारी, अभिलाष अच्युतगटला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Reactions

Post a Comment

0 Comments