Hot Posts

6/recent/ticker-posts

बेंबळे जि.प. गटातून संभाजी ब्रिगेडच्या शिवमती सुनिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 बेंबळे जि.प. गटातून संभाजी ब्रिगेडच्या शिवमती सुनिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल



माढ्यात संभाजी–जिजाऊ ब्रिगेडचे शक्तिप्रदर्शन

माढा (कटूसत्य वृत्त) :- माढा तालुक्यातील बेंबळे जिल्हा परिषद गट क्रमांक १२ या मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडच्या अधिकृत उमेदवार शिवमती सुनिता तात्यासाहेब पाटील (सापटणे–टें) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्याकडे माढा येथे दाखल केला. या प्रसंगी संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकप्रकारे संघटनेचे शक्तिप्रदर्शन केले.

उमेदवारी अर्ज दाखल करताना जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती लता जगदाळे, संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवश्री दिनेश जगदाळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवश्री सचिन जगताप, जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन खुळे, माजी जिल्हा सचिव शिवश्री सुहास टोणपे, तालुका कार्याध्यक्ष शिवश्री रामभाऊ मिटकल, माढा तालुकाध्यक्ष अविनाश पाटील, तालुका उपाध्यक्ष अरूण जगताप, वाय. जी. भोसले सर, पिंपळनेर गटप्रमुख अभयसिंह पाटील, शिवश्री प्रशांत गिड्डे, सुनिल जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिवमती सुनिता पाटील या सामाजिक कार्यातून पुढे आलेल्या, महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या आणि सर्वसामान्यांशी थेट नाते जोडणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण तसेच शेतकरी व कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना जिल्हा परिषद स्तरावर प्रभावीपणे मांडण्याची त्यांची भूमिका ठाम आहे.

उमेदवार शिवमती सुनिता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना सांगितले की, “बेंबळे गटातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी प्रामाणिकपणे जपेन. जिल्हा परिषदेमध्ये सामान्य जनतेचा आवाज बनून काम करेन. महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.”

उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बेंबळे जिल्हा परिषद गटातील निवडणूक प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली असून, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून ही निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. येत्या काळात या मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments