पैसे वाटपाचे व्हिडिओ व्हायरल, सत्ताधारी पक्षांतच संघर्ष
निवडणूक आयोगाच्या नव्या मशीनवर संशय; लोकशाही धोक्यात? – रोहित पवारांचा घणाघात
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- राज्यातील विविध शहरांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्रास पैसे वाटप होत असल्याचे असंख्य व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या प्रकरणात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पैसे वाटप करताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना पकडत असून, त्यातून परस्परांमध्ये तणाव वाढत जीवघेणे हल्ले होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
या संपूर्ण प्रकारावर आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सत्ताधारी पक्षांवर आणि निवडणूक प्रक्रियेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “सत्तेसाठी पैशांचा उघड वापर होत असून, त्यातून सत्ताधारी पक्षांमध्येच हिंसक संघर्ष सुरू आहे. हे चित्र लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे,” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
याच दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना न देता निवडणूक आयोगाने एक नवीन मशीन आणले असून ते थेट ईव्हीएमला जोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हे मशीन नेमके काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, आणि ते कशासाठी वापरले जाणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत, स्पष्ट माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तीव्र आक्षेप नोंदवले असून, त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न “धक्कादायक आणि लोकशाहीसाठी धोकादायक” असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. “जर निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नसेल, तर निवडणुका घेण्याचा हा सगळा प्रकार केवळ एक फार्स ठरत नाही ना?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रोहित पवार पुढे म्हणाले, “जर असेच करायचे असेल, तर भाजपने लोकशाहीच्या फोटोला हार घालून या निवडणुकीत त्यांचे सर्वच उमेदवार निवडून आले, असे जाहीर करावे.” या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
एकीकडे पैशांच्या जोरावर मते विकत घेण्याचे आरोप, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होणे, यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सर्व आरोपांवर निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लोकशाही धोक्यात, सत्तेचा गैरवापर, Save Democracy अशा हॅशटॅगसह सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

No comments:
Post a Comment