वाचनाने जाणिवा समृद्ध होतात – नितीन वैद्य
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त सोलापुरात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वाचन ही केवळ मनोरंजनाची बाब नसून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. व्यापक आणि सातत्यपूर्ण वाचनामुळे माणसाच्या जाणिवा समृद्ध होतात, विचारांची खोली वाढते आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ होतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक नितीन वैद्य यांनी केले.
सिद्धेश्वर पेठ येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी भूषविले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, तालुका ग्रंथपाल धोंडीराम जेऊरकर, श्रीमती वृषाली हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नितीन वैद्य पुढे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनाची सवय कमी होत चालली आहे. मात्र पुस्तकांशी मैत्री केल्यास माणूस अधिक संवेदनशील, विचारशील आणि जबाबदार नागरिक बनतो. विशेषतः मातृभाषेतील साहित्य वाचन केल्यास सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ होते आणि भाषेचे जतन व संवर्धन घडून येते.
प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची माहिती देत, जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांनी या कालावधीत विविध उपक्रम, वाचन चळवळी, साहित्यिक कार्यक्रम व ग्रंथ प्रदर्शनांचे आयोजन करून वाचन संस्कृती रुजवावी, असे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतात ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यात ग्रंथालयांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे सांगितले. “ग्रंथालये ही केवळ पुस्तके ठेवण्याची जागा नसून, ती ज्ञान, विचार आणि संस्कृतीची केंद्रे आहेत. मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येक वाचकाने आणि नागरिकाने उत्स्फूर्तपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय ढेरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रदीप गाडे यांनी केले होते. या कार्यक्रमास विविध वयोगटातील वाचक, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या ग्रंथ प्रदर्शनामुळे वाचन चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
.png)
0 Comments