शक्तीपीठ महामार्गाचा मूळ मार्ग कायम ठेवण्याची आ.बाबासाहेब देशमुख यांची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 1, 2026

शक्तीपीठ महामार्गाचा मूळ मार्ग कायम ठेवण्याची आ.बाबासाहेब देशमुख यांची मागणी

 शक्तीपीठ महामार्गाचा मूळ मार्ग कायम ठेवण्याची आ.बाबासाहेब देशमुख यांची मागणी



सांगोला (कटूसत्य वृत्त): महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता सदर प्रकल्पाचे काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे, अशी ठाम मागणी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी व दूरदृष्टीपूर्ण प्रकल्प असून हा महामार्ग सांगोला व पंढरपूर तालुक्यातून जात आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रे, औद्योगिक केंद्रे तसेच ग्रामीण भाग यांना जोडणारा हा महामार्ग दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या आर्थिक, सामाजिक तसेच धार्मिक पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

या महामार्गाचा मूळ आराखडा ठरविताना तांत्रिक, भौगोलिक तसेच लोकहिताच्या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करूनच तो मंजूर करण्यात आला आहे. मात्र सध्या मूळ आराखड्यात बदल करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. असे बदल झाल्यास शेतकरी, स्थानिक नागरिक तसेच प्रकल्पाच्या एकूण खर्च व कालमर्यादेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आमदार देशमुख यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शक्तीपीठ महामार्गामुळे संबंधित भागातील दळणवळण अधिक सुलभ होऊन औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती तसेच पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचा मूळ आराखडा कायम ठेवून जीएमआर कंपनीमार्फत नियोजित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने काम पूर्ण करून हा महामार्ग लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages