सोलापूरात गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप
विरोधकांचा दारातच ठिय्या
वेळेच्या मर्यादेवरून वाद; निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ हा शेवटचा दिवस असताना, भाजप उमेदवारांच्या A.B. फॉर्मवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस पक्षाने भाजपच्या उमेदवारांच्या A.B. फॉर्म दाखल करण्याच्या वेळेवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व उमेदवारांचे A.B. फॉर्म दुपारी ३ वाजण्यापूर्वी नियमानुसार दाखल करण्यात आले, असे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले. मात्र भाजपचे शहर अध्यक्ष व वरिष्ठ नेते दुपारी २:४५ वाजता मुख्य निवडणूक कार्यालय असलेल्या नॉर्थकोट तांत्रिक प्रशाला, सोलापूर येथे A.B. फॉर्म घेऊन दाखल झाले. त्यानंतर एकूण सात निवडणूक कार्यालयांमध्ये हे फॉर्म सादर करताना वेळ लागल्याने अंतिम मुदत ओलांडली गेल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, भाजपचे A.B. फॉर्म दुपारी ३:०५ वाजता दाखल करण्यात येत असताना शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे व मित्रपक्षांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली तीव्र हरकत नोंदविण्यात आली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ठरलेल्या वेळेनंतर A.B. फॉर्म स्वीकारणे चुकीचे असल्याचे काँग्रेसने स्पष्टपणे मांडले.
या संपूर्ण प्रकरणाबाबत सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त तसेच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. हे निवेदन काँग्रेसचे सरचिटणीस अँड. केशव इंगळे, काँग्रेसचे मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला तसेच युवक काँग्रेसचे रुपेश इंगळे यांनी सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक प्रक्रियेत सर्व पक्षांसाठी नियम समान असावेत आणि कोणत्याही पक्षाला वेळेच्या नियमांबाबत सवलत दिली जाऊ नये. जर नियमानुसार वेळेच्या बाहेर A.B. फॉर्म दाखल झाले असतील, तर संबंधित उमेदवारांची उमेदवारी रद्द करावी, अशी ठाम मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
या घटनेमुळे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले असून, निवडणूक आयोग या प्रकरणावर काय निर्णय घेतो याकडे सर्व राजकीय पक्षांचे आणि मतदारांचे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment