Hot Posts

6/recent/ticker-posts

वाळू माफियांपुढे प्रशासन झुकले का? वकिलावर जीवघेणा हल्ला

 वाळू माफियांपुढे प्रशासन झुकले का? वकिलावर जीवघेणा हल्ला






भारत नाना पाटील यांच्यावर काळे तेल; राम सातपुते यांचा हात असल्याचा आरोप


आय पी एस अंजना कृष्णा व टेंभुर्णी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न, फडणवीसांची चौकशी आदेश

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननातून माढा तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या प्रकरणाला आता थेट राजकीय आणि प्रशासकीय वळण लागले आहे. अकोले खुर्द येथील वकील भीम पांडुरंग तोडकर यांच्यावर वाळू तस्करांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद थेट विधिमंडळ अधिवेशनात उमटले. या प्रकरणात पोलिस व महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देण्याची घोषणा केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील वाळू तस्करीशी संबंधित सर्वात गंभीर घटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हल्ल्यानंतरही अवैध वाळू उपसा रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, करमाळा विभागाच्या धडाडीच्या प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांची प्रतिमा कडक आणि दबंग अधिकारी म्हणून ओळखली जाते. करमळ्यापासून 50 ते 55 किलोमीटर अंतरावर  जाऊन करवाई करतात मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोनवरही विश्वास न ठेवता व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडणाऱ्या अंजना कृष्णा यांनी कुर्डू गावातील मुरम उत्खननावर मोठी कारवाई केली होती. मात्र, करमाळ्यापासून अवघ्या ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर असलेले टेंभुर्णी, अकोले खुर्द, फूट जवळगाव परिसरातील मोठमोठे वाळू उत्खननाचे आड्डे त्यांना का दिसले नाहीत, महाराष्ट्र मध्ये अल्पवयीन मुलीवरती होणाऱ्या अत्याचाराला अळा बसण्यासाठी फोक्सो सारख्या ॲट्रॉसिटी सारख्या अनेक गुन्हेचा तपास होत नाही
असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.

टेंभुर्णी पोलीस ठाण्यापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर अनेक दिवसांपासून खुलेआम वाळू काढली जात असताना पोलीस आणि महसूल यंत्रणा ‘आंधळी’ कशी बनली, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे धाडस दोन अधिकारी का करू शकत नाहीत? त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे? राजकीय दबाव आहे की आर्थिक साटे-लोटे ? असे प्रश्न आता उघडपणे नागरिकात चर्चेत आहेत.

या पार्श्वभूमीवर, वाळू माफियांविरोधात मोर्चे काढून आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा लेबर, क्रीडा व रेशन समितीचे चेअरमन भारत नाना पाटील यांच्यावर काळे तेल ओतण्याचा धक्कादायक प्रकार घडला. अकोले खुर्द येथील वकील तोडकर यांना मारहाण करून हातपाय मोडल्याच्या घटनेनंतर अकोले खुर्द व फूट जवळगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ठराव करून वाळू बंदी जाहीर केली होती. आरोपींना अटक करा, अन्यथा रस्ता रोको करू, असा इशारा भारत नाना पाटील यांनी दिला होता. याच रागातून टेंभुर्णी-करमाळा रोडवरील पुलाजवळील हॉटेलसमोर दोन तरुणांनी त्यांना धरून ठेवत, शिवीगाळ व घोषणाबाजी करत त्यांच्या अंगावर काळे तेल ओतल्याचा आरोप आहे.

हा प्रकार घडल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचून आरोपींना ताब्यात घेतल्याने उलट प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपी महिना-महिना फरार राहतात, मात्र या घटनेत पोलिसांची तत्परता इतकी कशी, यामागे राजकीय दबाव आहे का, अशी चर्चा माढा तालुक्यात रंगली आहे. या घटनेमागे आमदार राम सातपुते यांचा हात असल्याचा संशय भारत नाना पाटील यांनी सोशल मीडियावरील मुलाखतीत व्यक्त केला आहे.

याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आम्ही अन्य कारवाईसाठी जात असताना हा प्रकार समोर आल्याने तातडीने हस्तक्षेप केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, दिवसभर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अकोले खुर्द व फूट जवळगाव येथील नेते, ग्रामस्थ ठाण्यात ठाण मांडून बसले होते. गुन्हे दाखल करण्यास उशीर का झाला, असा सवाल उपस्थित झाला. अखेर गावकऱ्यांच्या दबावामुळे संध्याकाळी उशिरा गुन्हा दाखल झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, एकाच दिवशी टेंभुर्णी शहरात दलित समाजाचा मोर्चा, अकोले खुर्द-फूट जवळगाव ग्रामस्थांचा मोर्चा आणि भिमानगर येथे शेतकरी संघटनेचा मोर्चा असे तीन मोर्चे निघाले. हे मोर्चे सीसीटीव्हीत कैद झाले असून, ते आमने-सामने आले असते तर संपूर्ण महाराष्ट्रात दोन समाजांत तेढ निर्माण झाली असती, अशी भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात टेंभुर्णी पोलीस ठाणे पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. याआधीही अशाच प्रकारातून  वीस वर्षाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. बी. गोरे यांची  बदली झाल्याची आठवण टेंभुर्णी नागरिकातून होत आहेत.

या सर्व प्रकरणावर अधिवेशनात चर्चा होताच करमाळा विभागीय अधिकारी आयपीएस अंजना कृष्णा व्ही.एस. आणि टेंभुर्णी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची चौकशी करून निलंबनाची मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील वाळू माफिया, पोलिस व प्रशासनाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.

आज या चौकशीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात, दोषींवर खरोखर कारवाई होते की पुन्हा बळीचा बकरा शोधला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा, वाळूसाठी पुन्हा कुणाला जीव गमवावा लागला तर त्याची जबाबदारी कोणाची, असा थेट सवाल आता सर्वसामान्य नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments