गरज हीच संशोधनाची जननी- डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भावी संशोधक विद्यार्थ्यांनो, 'गरज ही संशोधनाची जननी' आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवातून शिका. एखादी गोष्ट 'का' आणि 'कशी' घडते, यावर विचार केल्यास तुम्हाला नवी दृष्टी मिळेल. आपली कल्पनाशक्ती वाढवा आणि चेतना जागृत करा; तुम्ही संशोधनात नक्कीच प्रगती करू शकाल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे व्ही जी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधनाला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या विद्यापीठ स्तरीय 'अविष्कार' महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, संचालक डॉ. व्ही. बी. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य देवानंद चिलवंत आदी मान्यवर उपस्थित होते. व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, विश्वस्त भीमाशंकर शेटे व नरेंद्र गंभीरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सुत्रावे यांनी प्रास्ताविक केले, तर अविष्कार महोत्सवाचे सह समन्वयक डॉ. अशोक शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. समन्वयक डॉ. विनायक धुळप यांनी 'अविष्कार' महोत्सवाचा उद्देश व माहिती विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभदा उपासे व प्रियांका धुत्तरगी यांनी केले, तर डॉ. ए. बी. वळसंगे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला युनिक स्कूलच्या बँड पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी, युनिक स्कूलच्या किरण जोजारे व सहकाऱ्यांनी सुगम संगीताचा बहारदार कार्यक्रम सादर केला. महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर श्री. योगीनाथ बिराजदार यांनी गायलेल्या 'वंदे मातरम्'ने सांगता झाली.
------
संशोधकांनी समाजाभिमुख विचार करावा
"विद्यार्थ्यांनी संशोधन करताना त्याचा समाजाला काय उपयोग होईल, याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याने कोणत्याही विषयावर संशोधन करावे, ही काळाची गरज आहे."
— प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू
------
३९१ पैकी २४६ विद्यार्थिनींचा सहभाग
या स्पर्धेत सहा विभागांतून शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील एकूण ३९१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे, यात २४६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. या महोत्सवात पदवी, पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थ्यांनी २७३ पोस्टर्स आणि ३६ मॉडेल्स सादर केली आहेत. यातून परीक्षक मंडळ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ४८ विद्यार्थ्यांची निवड करणार आहे.
-----
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ४८ विद्यार्थ्यांची होणार निवड
डॉ. सागर कोंडेकर, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. निलेश तरवळ, डॉ. ज्ञानेश्वर देशमुख, डॉ. कृष्णा अळसुनकर, डॉ. विकास सरनाईक, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. गोपाळ पांचाळ, डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. प्रशांत अग्निहोत्री आणि डॉ. संदीप पाटील हे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. निवडलेले विद्यार्थी परभणी येथे १२ ते १५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय 'अविष्कार' स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.

0 Comments