Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुरातील पिण्याचे पाणी आणि तरुणांचे नौकरीचे प्रश्न सोडविण्याला प्रथम प्राधान्य देणार- अण्णा बनसोडे

 सोलापुरातील पिण्याचे पाणी आणि तरुणांचे नौकरीचे प्रश्न सोडविण्याला प्रथम प्राधान्य देणार- अण्णा बनसोडे 





सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  गेल्या तीन दिवसापासून आपण सोलापूर शहराच्या दौऱ्यावर होतो. आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शहरातील २६ प्रभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांनी अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी यासह गटारी, उद्योग व्यवसाय नसणे,परिणामी बेरोजगारी या प्रश्नांचा भडीमार केला आहे. त्यामुळे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तीन दिवसातील घडामोडींचा अहवाल देणार आहोत. शिवाय सोलापूरसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पिण्याच्या पाण्याचा तसेच तरुणांना नौकरी व  बेरोजगारांना रोजगार देण्याबरोबरच महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची मागणी करणार असून पिण्याच्या पाण्याचा व तरुणांना नौकरी हे प्रश्न सोडविण्याला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी बाळे येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या फार्म हाऊसवर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
     सोलापूर शहरात पहिल्या दिवशी आलो ,त्यावेळेस विविध भागात भेटीत देत असताना बरेचसे अनुभव आले. मात्र त्यानंतरचे दोन दिवस शहरातील एकूणच वातावरण पाहता आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत १०० टक्के अबकी बार ७५ पार झालेले दिसेल ,असेही बनसोडे यावेळी बोलताना म्हणाले.
    भारतीय जनता पार्टीची सोलापूर महापालिकेत सत्ता असताना सुद्धा रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेला नाहीत. पिण्याचे पाण्याचा प्रश्न जैसे तेच आहे. रोजगाराचा मोठा प्रश्न या ठिकाणी दिसून येतो. ठीकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. या प्रश्नाला म्हणावी तशी गती मिळालेली दिसत नाही.याच प्रमुख मुद्द्यावर येणारी महापालिका आपण स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
   सोलापूर शहरात एमआयएमचे एकूण ९ नगरसेवक असून सहा नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात आले आहेत. उर्वरित तीन नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाच्या घरी आपण सदिच्छा भेट दिली आहे. उर्वरित दोघांशीही संपर्क सुरू आहे. सोलापूरचे चित्र निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलताना दिसेल. अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून अर्थमंत्रीसुद्धा आहेत.त्यामुळे निधी देताना अजितदादा निश्चितच राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांचा विचार करतील, असेही बनसोडे म्हणाले. सोलापूर शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच एमआयएमच्या नेते मंडळींनी सुद्धा विकास कामासाठी निधीची मागणी पत्राद्वारे आपल्याकडे केली आहे. निश्चितच अजितदादा पवार यांच्याकडून निधी देण्याला आपण प्राधान्य देऊ,असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
  सोलापुरात नोकऱ्या नाहीत, हाताला काम नाही,म्हणून सोलापुरातील तरुण मोठ्या प्रमाणावर पुण्यात हिंजवडीमध्ये नोकरी करत आहेत. इतक्या वर्षात सोलापूरकरांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणे महत्त्वाचे होते, परंतु त्याकडे राजकारणी मंडळींनी फारसे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही. सोलापूर हे आयटी हब होणे गरजेचे होते. कारखान्यांमध्ये सुद्धा तरुणांना नोकरी मिळणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने ते होऊ शकलेली  नाही. त्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न सोलापुरात भेडसावत आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना अनेक वर्षापासून पदोन्नती दिलेली नाही. रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. हे प्रश्न सोडविण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे अण्णा बनसोडे म्हणाले.
सोलापूर शहरामध्ये नेमकी कोणती कामे केली पाहिजेत, कोणत्या पद्धतीने सोलापूरचा विकास झाला पाहिजे, याबाबत चर्चा झाल्यानंतरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपणास सोलापूरचे सहसंपर्क मंत्री म्हणून नेमले आहे. सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले तर निर्माण झालेले सर्व प्रश्न निश्चितच सुटणार आहेत,असेही ते म्हणाले. संपूर्ण राज्यातील २२ महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. जवळपास आठ ते नऊ वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासक असल्यानंतर म्हणावा तसा विकास होत नाही. त्यासाठी स्थानिक जनता किंवा नगरसेवकच असणे गरजेचे आहे. प्रभागातील अडचणी या लोकप्रतिनिधींनाच माहिती असतात, अधिकाऱ्यांना त्या माहिती असण्याचे कारणच नाही. कारण ते प्रशासकीय पातळीवर काम करत असतात.त्यामुळे लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्यानंतर निवडून येणारा लोकप्रतिनिधी आपापल्या भागाचा विकास करू शकतो,असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
  या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहर - जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे, ज्येष्ठ नेते तौफिक शेख,नूतन गायकवाड, चित्रा कदम, प्रमोद भोसले वैभव गंगणे आदी उपस्थित होते.
==================
 राष्ट्रवादीचे कार्यालय स्व:मालकीच्या जागेत !
==================
 सोलापूर शहरामध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादीचे स्व : मालकीचे संपर्क कार्यालय नसल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना अण्णा बनसोडे म्हणाले, सरकारी जागेत अजितदादा पवार राष्ट्रवादीचे कार्यालय असण्यापेक्षा स्व:मालकीच्या जागेत राष्ट्रवादीचे कार्यालय होण्यासाठी आपण सर्वाधिक प्रयत्न करत आहोत. लवकरच सोलापुरात स्व :मालकीच्या जागेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहराचे कार्यालय दिसेल, असे सहसंपर्क मंत्री बनसोडे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला ठामपणे उत्तर देताना सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments