मानेगाव, बार्शी व सीना-माढा उपसासिंचन योजनेसाठी निधीची तरतूद करावी
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील सीना नदीवरील खैराव-कुंभेज येथील बंधाऱ्यातून कार्यान्वित होणाऱ्या मानेगाव उपसासिंचन योजनेस तत्कालीन आमदार बबनराव शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाची तत्त्वतः अंतिम मंजुरी मिळालेली आहे परंतु निधीअभावी हे काम प्रत्यक्षात सुरू झाले नाही. तेंव्हा मानेगाव उपसासिंचन योजनेचे काम सुरू करण्यासाठी, बार्शी उपसासिंचन योजनेतून माढा तालुक्यातील विविध गावातील उर्वरित कामांसाठी व सीना-माढा उपसासिंचन योजनेची उर्वरित कामे व नव्याने समाविष्ट गावातील कामे पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे येत्या हिवाळी अधिवेशनात निधीची तरतूद करण्याची मागणी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी मुंबई येथे केली आहे.
माढा तालुक्याच्या पूर्व भागातील मानेगाव,खैराव, बुद्रुकवाडी,धानोरे देवी, कापसेवाडी,हटकरवाडी या गावातील सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याच्या दृष्टीने माजी आमदार बबनराव शिंदे व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करून मानेगाव उपसासिंचन योजनेस शासनाची तत्त्वतः अंतिम मंजुरी घेतली आहे परंतु प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी शासनाकडून निधीची उपलब्धता झाली नाही. बार्शी उपसासिंचन योजनेतून माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे,वडाचीवाडी (अं.उ), जामगाव,तांदूळवाडी व दारफळ सीनाचा पूर्व भाग या पाच गावांतील सुमारे दोन हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याच्या दृष्टीने भूमिगत पाइपलाइनद्वारे काही भागात पाणी सोडले आहे परंतु काही भागातील कामे अपूर्ण आहेत त्यासाठी निधीची आवश्यकता आहे.सीना-माढा उपसासिंचन योजनेतील उर्वरित कामे व नव्याने समाविष्ट बावी, तुळशी,अंजनगाव खेलोबा, परितेवाडी,अंबाड,कुर्डू व पिंपळखुंटे भागातील कामे सुरू करून पूर्ण करण्यासाठी भरीव निधीची गरज आहे. ही सर्व कामे पूर्णत्वास गेल्यावर या भागातील हजारों हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तेंव्हा या अत्यंत महत्त्वाच्या व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या तीनही उपसासिंचन योजनेच्या विविध प्रकारच्या कामांसाठी येत्या 8 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्यासमवेत चर्चा करून भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रणजितसिंह शिंदे यांनी केली आहे.
-चौकट -
मानेगाव उपसासिंचन योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी,बार्शी उपसासिंचन योजनेत समाविष्ट माढा तालुक्यातील विविध गावातील उर्वरित कामे तसेच सीना-माढा उपसासिंचन योजनेची उर्वरित कामे व नव्याने समाविष्ट गावातील कामे करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे. त्यास त्यांनी सकारात्मकता दर्शविली असून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही दिली असल्याचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले आहे.

0 Comments