Hot Posts

6/recent/ticker-posts

शाश्वत आर्थिक उत्पन्नासाठी कृषि मालाचे मूल्यवर्धन करणे गरजेचे- निगडे

 शाश्वत आर्थिक उत्पन्नासाठी कृषि मालाचे मूल्यवर्धन करणे गरजेचे- निगडे




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ जि. सोलापूर आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने दि. ०४ ते ०६ डिसेंबर, २०२५ या कालावधी दरम्यान प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) अंतर्गत जिल्हास्तरीय क्षमता बांधणी व प्रशिक्षण घटकांतर्गत “अन्न प्रक्रिया उद्योजकता विकास” प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. 
सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन तालुका कृषि अधिकारी मोहोळ हर्षद निगडे यांचे हस्ते झाले. याप्रसंगी कृषि विज्ञान केंद्र, मोहोळचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, सदर प्रशिक्षणाचे समन्वयक व अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विषय विशेषज्ञ दिनेश क्षिरसागर, पिक संरक्षण विषयाचे विषय डॉ. पंकज मडावी, कृषी विस्तार विषयाचे विषय विशेषज्ञ डॉ. विशाल वैरागर, मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विषयाच्या विषय विशेषज्ञ श्रीमती काजल म्हात्रे, कृषि विद्या विषयाच्या विषय विशेषज्ञ डॉ. स्वाती कदम हे उपस्थित होते.
हर्षद निगडे यांनी शाश्वत आर्थिक उत्पन्नासाठी कृषि मालाचे मूल्यवर्धन करणे गरजेचे आहे असे अवाहन करून कृषि प्रक्रिया उद्योगासाठी सहाय्यभूत योजनांची माहिती दिली. डॉ. तानाजी वळकुंडे यांनी यशस्वी प्रक्रिया उद्योजक होण्याकरिता ग्रामीण युवकांनी कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ या कार्यालयाच्या मदतीने परिपूर्ण माहिती व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन कृषि प्रक्रिया उद्योग उभारावेत असे नमूद केले. अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विषय विशेषज्ञ दिनेश क्षिरसागर यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि व्यवसाय वाढीसाठी अन्न प्रक्रिया उद्योजकांनी पौष्टिक, निर्भेळ आणि नाविन्यपूर्ण उत्पादने निर्मित करून आपल्या उत्पादनाचे आकर्षक पॅकेजिंग, ब्रॅंडिंग आणि विपणन करावे असे मत व्यक्त केले.
प्रशिक्षणा दरम्यान तांत्रिक सत्रांत सदर प्रशिक्षणाचे समन्वयक दिनेश क्षिरसागर यांनी ज्वारी व भरड धान्ये प्रक्रिया, फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञान, बेकरी आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती तंत्रज्ञान, ऑईल मिल, मसाले प्रक्रिया उद्योग आणि आवश्यक यंत्र सामुग्री व पॅकेजिंग मधील अद्यावत तंत्रज्ञान, तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, परवाना व नोंदणी या बाबत सविस्तर माहिती दिली. 
डॉ. तानाजी वळकुंडे यांनी दुग्ध प्रक्रिया व पशुखाद्य निर्मिती उद्योग, योजनेंतर्गत प्रकल्प अहवाल मुल्यांकन व वित्त व्यवस्थापन या विषयावर, डॉ. विशाल वैरागर यांनी उद्योजकता विकास व विपणन संधी या विषयावर आणि कार्यक्रम सहाय्यक संगणक सुयोग ठाकरे यांनी डिजीटल मार्केटिंग साठी सोशल मिडिया माध्यमांचा वापर याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणा दरम्यान दिनांक ०६ डिसेंबर , २०२५ रोजी श्री. तुषार कदम यांच्या खंडोबाचीवाडी ता. मोहोळ येथील सर्वस्व दूध व दुग्ध प्रक्रिया उद्योग येथे अभ्यास दौरा व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थीनी दुधाचे होमोजिनायझेशन, पाश्चरायझेशान, पॅकिंग, खवा, पनीर आणि लस्सी दुग्ध उत्पादने निर्मिती तसेच पॅकेजिंग तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासह आत्मसात केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश क्षिरसागर तसेच आभार प्रदर्शन डॉ. पंकज मडावी यांनी केले. सदर प्रशिक्षणास सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा स्तरीय समिती मार्फत शिफारशीत मंजूर लाभार्थी हे बहूसंख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments